Pune : उन्हाळ्याचा चटका, पुण्याचे तापमान ३७ अंशांवर!

पुणे : शहरातील कमाल तापमानात एक अंशाने वाढ होऊन उन्हाचा पारा ३७ अंशांपुढे नोंदविला गेल्या. त्यामुळे बुधवारी दिवसभर उन्हाचा चांगलाच चटका जाणवत होता. कोरेगांव पार्क येथे सर्वाधिक ३७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस उन्हाचा चटका वाढणार असल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले.
शहरासह जिल्ह्यात बुधवारी पहाटे विरळ धुके तर हलकासा गारवा होता. किमान तापमानातही एक ते दोन अंशांनी वाढ झाली. त्यामुळे सकाळी हवेली परिसरात १३.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर एनडीए, शिवाजीनगर आणि पाषाण परिसरात १४ ते १५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, दुपारच्या सुमारास पारा ३७ अंशांपुढे गेल्यामुळे कोरेगांव पार्क, वडगावशेरी, दापोडी, शिवाजीनगर, एनडीए, मगरपट्टा भागातील कमाल तापमानात ३५ अंशांच्या पुढे होते.
त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागल्याची जाणीव झाली. दरम्यान, पुढील दोन दिवसात शहर आणि जिल्ह्यात आकाश निरभ्र आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. विरळ धुके पडेल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
जिल्ह्यातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
लोणावळा- १३.५ हवेली- १३.६, एनडीए- १४.५, शिरूर -१४.९, बारामती-१५, शिवाजीनगर- १५.९, पाषाण- १६, बालेवाडी- १७.७, भोर-१८.१, कोरेगांव पार्क- १९.५, चिंचवड- २०.२, मगरपट्टा- २०.५, वडगांवशेरी- २०.७




