Pune : आरोग्य यंत्रणेने नेहमी तत्पर राहावे : जिल्हाधिकारी डुडी

पुणे : जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे अनेक योजना राबविल्या जातात. या योजनाची शहरी व ग्रामीण भागांत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, तसेच गरजू रुग्णांना वेळेत योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने नेहमी तत्पर राहावे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत डुडी बोलत होते. या वेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई उपस्थित होते.
डुडी म्हणाले, की प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात गरजू रुग्णांना उत्तम आरोग्यविषयक सेवा तात्काळ उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती सर्व साधनसामग्री, औषधसाठा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने रुग्णालयांनी दक्ष राहावे, तसेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घ्यावा. प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात पदभर्तीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा.





