Pune : अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट्र कारभाराचा कहर

पुणे : राज्य शासनाचे नियम धुडकावत शिक्षक भरती करून त्यांना वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडीही देण्यात आले. त्यांच्या वेतनासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडाही केल्याबाबतची भरमसाट धक्कादायक प्रकरणे उघड होत असल्याने शालेय शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.
राज्यात बोगस शिक्षक भरती घोटाळ्याने थैमान घातले आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या तरी जिल्ह्यातून बोगस भरती घोटाळ्याची माहिती उघड होत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे अपात्र असतानाही शिक्षकांना नियुक्त्या दिल्या आहेत. अनेक वर्षे काम करूनही संस्थाचालक पगार देत नाहीत. उलट नोकरी टिकवून ठेवण्यासाठी संबंधित शिक्षकांकडून डोनेशनसाठी हट्ट धरतात. शासनाकडून पगारासाठी अनुदान आले, तरी पगार प्रलंबितच ठेवले जातात. त्यामुळे संस्थाचालकांच्या विविध प्रकारच्या जाचाला कंटाळून शिक्षक आत्महत्या करू लागले असल्याने ही गंभीर बाब बनली आहे.
नागपूर, नाशिक विभागांसह अन्य विभागांतीलही घोटाळ्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, मृत शिक्षणाधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षरीचे आदेशही प्राप्त होऊ लागले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्याच्या घटनाही वाढत आहेत.
२ मे २०१२ रोजी राज्य शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातली होती. बंदी असूनही बहुसंख्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत शिक्षक भरती करून त्यांना नियमबाह्य मान्यता देण्याचे प्रकार घडले आहेत. या मान्यता तपासण्यासाठी शासनाने समिती नियुक्त केली होती. समितीच्या अहवालानुसार ४ हजार ११ शिक्षकांना अपात्र ठरवण्यात आले. संबंधित शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे व त्यांचे वेतन थांबविण्याच्या केवळ घोषणाच करण्यात आल्या. प्रत्यक्षात त्यावर ठोस कोणतीच कारवाई झाल्याचे आढळत नाही.
चौकशा समित्यांचे सोपस्कार
शालेय शिक्षण विभागाकडून चौकशा समित्या नियुक्त करण्याचे केवळ सोपस्कार केले जातात. अधिकाऱ्यांचे एकमेकांशी लागेबांधे असल्याने समित्यांच्या चौकशांमधून काहीच ठोस निष्पन्न होत नाही. चौकशा समित्यांमध्ये काम करण्यासाठी प्रामाणिक अधिकारीही फारसे शिल्लक नाहीत. अहवालावरही कारवाई होत नाही.
उत्पन्न स्रोतापेक्षा अधिक संपत्ती
शालेय शिक्षण विभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाचखोरीच्या माध्यमातून उत्पन्न स्रोतापेक्षा अधिक आर्थिक संपत्ती जमा केली आहे. गैरव्यवहारातील लाखो रुपयांच्या माध्यमातून दागदागिने, आलिशान गाड्या, जमिनी, फार्म हाउस, बंगले, सदनिका यांच्यात गुंतवणूक केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातूनच विविध ठिकाणच्या सहली, पार्टी, वाढदिवस, लग्नसमारंभ यावरही लाखो रुपयांचा खर्चही केला जात असल्याची चर्चा रंगलेली असते.





