पुणे – ‘तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार चारसो पार’ असा नारा देत राज्यातील लोकसभेच्या सर्वच ४८ जागा निवडून आणण्याचा निर्धार रविवारी महायुतीच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय आणि मनोमिलन साधण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रिपाइं (आठवले गट) आणि मित्र पक्षांच्या पुणे जिल्ह्याच्या संयुक्त मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहरप्रमुख अजय भोसले आणि प्रमोद भानगिरे, रिपाइंचे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्यासह तिन्ही पक्षाचे आमदार उपस्थित होते. या मेळाव्याच्या निमित्ताने एकमेकांमध्ये समन्वयाचा प्रयत्न करण्यात आला. राम नामाच्या ताकदीमुळे काॅंग्रेसचे नेते घाबरले आहेत. काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यांना उमेदवार मिळतो की नाही अशी शंका आहे. महायुतीचा उमेदवार दहा लाख मते घेतल्याशिवाय आणि विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेच्या ४८ जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जो उद्योग केला, त्यामुळे त्यांना सोसावा लागला. आमच्या निर्णयाची आम्ही वाट बघतो आहोत. तो निर्णयही अजित पवारांच्या बाजूने लागल्याशिवाय राहणार नाही. पुण्याचा लोकसभेचा महायुतीचा उमेदवार राज्यात सर्वाधिक मताने निवडून आणायचा संकल्प करूयात, असे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर प्रास्ताविकात म्हणाले. कार्यकर्त्यांना संधी, महामंडळे, छोटी मोठी पदे रिपाइंला द्या, तिघेच वाटून घेऊ नका, तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू, असे परशुराम वाडेकर म्हणाले. त्यावर काही करून पदे द्या असे म्हणू नका, सबका साथ सबका विकास हे आपण ठरवले आहे, असे जावडेकर म्हणाले. ४८ जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. निवडणुकीला १०० दिवसच राहिले आहेत. त्यासाठी घरोघरी जाऊन संपर्क करा, वेळापत्रक तयार करा, असा सल्ला जावडेकर यांनी दिला. पूर्वीच्या नेतृत्त्वाबद्दल मी बोलणार नाही, परंतु आता मोदींशिवाय पर्याय नाही. माझ्या नावात राम आहे, मी इतके वर्षे वनवासात होतो, मोदींमुळे बाहेर आलो, असे रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला येणार होते मात्र त्यांनी आपल्याला पाठवले असे ते म्हणाले. महायुती हाच आपला पक्ष झाला आहे ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असली पाहिजे. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन कटुता संपवा, असाही सल्ला त्यांनी दिला. प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी मेळाव्याची भूमिका मांडली. दोन्ही दादांची मेळाव्याकडे पाठ उपमुख्यमंत्री अजित पवार मेळाव्यात मार्गदर्शन करतील असे सांगितले गेले होते, मात्र ते अनुपस्थित राहिले. त्यांच्या वतीने त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना पाठवले. तर दुसरे दादा म्हणजे कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री या नात्याने सोलापूर दौर्यावर असल्याने तेही या मेळाव्याला आले नाहीत. पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ अनुपस्थित होत्या, तर चेतन तुपे यांनी मेळाव्याला हजेरी लावली परंतु अर्ध्यातूनच ते निघून गेल्याने त्याची विशेष चर्चा रंगली. भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, तर जिल्ह्यातील खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. लोकसभेसाठी इच्छुकांमध्ये सुनील देवधर, संजय काकडे, दिवंगत खा. गिरीश बापट यांच्या कुटुंबातील इच्छुक अनुपस्थित होते.