पुणे, – शहरात दरवर्षी तब्बल 300 ते 400 कोटींची रंगरंगोटी, पदपथ दुरुस्ती तसेच इतर अनावश्यक कामे केली जात आहेत. तर, पालिकेने दोन वर्षांपूर्वी अधिकृत भूमिपूजन केलेल्या ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे काम निधीअभावी रखडले होते. या कामासाठी प्रशासनाने अखेर 8 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानंतर आता पुन्हा हे रखडलेले काम सुरू करताना पालिका प्रशासनाने नवा पायंडा पाडत कामाचा शुभारंभ कार्यक्रम ठेवला आहे. या निमित्ताने स्मारकाच्या ठिकाणी कोनशीला लावली जाणार असून, या कामाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते केला जाणार आहे. महापालिकेच्या पहिल्यांदाच अशा प्रकारे आधी भूमिपूजन त्यानंतर काम सुरू करून ते बंद ठेवणे आणि नंतर निधी मिळाल्यावर कामाच्या शुभारंभानिमित्त कौतुक सोहळा ठेवणे असा प्रकार केला जात आहे. हा कार्यक्रम भवन विभागाकडून आयोजित करण्यात आला असून, या बाबतची माहिती माध्यमांना उपलब्ध करून देण्यास भवन विभागाचे अधिकारी “राजकीय दबाव’ असल्याचे सांगत असमर्थता व्यक्त करत आहेत. महापालिकेकडून एखादा प्रकल्प सुरू केल्यानंतर त्याचे भूमिपूजन आणि नंतर काम करून उद्घाटन केले जाते. त्यासाठीचे ठराव महापालिकेच्या संबंधित समित्यांमध्ये मान्य केले जातात. पण, ज्या कामाचे भूमिपूजन दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. तसेच माडगूळकर कुटुंबीयांनी पूजाही केली; तेच काम निधीअभावी रखडले. तर, अद्यापही प्रशासन निधी देण्यास तयार नव्हते. मात्र, काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड येथे ग.दि.मा. सभागृहाचे उद्घाटन झाल्यानंतर पुण्यातील स्मारक कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. त्यामुळे प्रशासनाने दि. 19 मे रोजी या कामासाठीची 8 कोटींची निविदा मंजूर केली. त्यानंतर लगेचच सहा दिवसांत हे काम सुरू करण्याचा निर्णय घेत मोठा पराक्रम केल्याचे दाखवत रखडलेले काम पुन्हा सुरू होत असल्याचा कार्यक्रम ठेवला आहे. मात्र, त्यासाठी प्रशासनाने थेट गदिमा स्मारकाचे नाव पुढे न करता याच आवारात उभारल्या जात असलेल्या “एक्झिबिशन सेंटरचे उर्वरित काम करणे अंतर्गत गदिमा स्मारकाचे काम सुरू करणे’ असा कार्यक्रम ठेवला आहे. अशा प्रकारच्या शुभारंभांच्या कार्यक्रमाचा घाट म्हणजे, पालिकेच्या अपरिपक्वतेचा परिपाक आहे. प्रशासनाने यापुढे बांधकाम, ड्रेनेज, विद्युत, फरशी बसविणे, झाडे लावणे, भिंती रंगविणे अशा कामांचा शुभारंभ करावा. पुणेकर प्रामाणिक पणे कर भरत असून महापालिकेने हा पैसा अशाच कामात उधळणे बाकी आहे. – विजय कुंभार, पुणे शहर कार्याध्यक्ष, आप महापालिकेच्या इतिहासाहातील हा ऐतिहासिक प्रसंग आहे. रखडलेल्या कामाला जबाबदार कोण? याचे काही नाही. मात्र, हे काम सुरू करताना पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी करण्यात महापालिका कमी पडलेली नाही. – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच