कोंढवा – कोंढवा बु.-येवलेवाडी प्रभाग क्र. ४० मध्ये भाजपच्या नगरसेवकांनी गेल्या काही वर्षांत राबवलेल्या विविध विकासकामांमुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून भाजपचा बालेकिल्ला अधिक मजबूत झाला आहे, असे प्रतिपादन विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांनी केले. प्रभाग क्र. ४० मधील ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची असून टिळेकर परिवाराची दीर्घकालीन पक्षनिष्ठा, संघटनबळ आणि सामाजिक बांधिलकीमुळे जनाधार भाजपाच्याच बाजूने राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र. ४० मध्ये भाजप-रिपाई युतीच्या अधिकृत उमेदवार अर्चना अमित जगताप, वृषाली सुनील कामठे, पूजा तुषार कदम व रंजना पुंडलिक टिळेकर यांच्या प्रचारार्थ साईनगर व गोकुळनगर परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला नागरिकांचा, विशेषतः महिला भगिनींचा प्रतिसाद लाभला. आमदार टिळेकर म्हणाले की, भाजपने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम करून दाखवले आहे. प्रभागातील मूलभूत सुविधा सक्षम करताना सर्वसामान्य नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देण्यात आले आहे. आगामी काळातही प्रभाग क्र. ४० चा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजप-रिपाई युती कटिबद्ध आहे. पदयात्रेदरम्यान अनेक ठिकाणी महिला भगिनींनी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. उमेदवारांनी आतापर्यंत झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडत नागरिकांशी थेट संवाद साधला. रस्त्यांचे डांबरीकरण, पाणीपुरवठा सुधारणा, ड्रेनेज लाइन, स्ट्रीट लाइट, उद्याने, सामाजिक व नागरी सुविधा आदी विकासकामांमुळे प्रभागाचा चेहरामोहरा बदलल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.