Pune : गुन्हे शाखेने ३९ जणांच्या नोंदविल्या साक्षी

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात गुन्हे शाखेने तब्बल ३९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या असून, २१ आरोपींविरुद्ध न्यायालयात १७०० पानी दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे व त्यांच्या सहकार्यांनी हे दोषारोप पत्र आज (१४ फेब्रुवारी) न्यायालयात सादर केले.
या आरोपींची मोक्काअंतर्गत मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. संजीवनी कोमकर यांच्या नाना पेठेत जनरल स्टोअर्सच्या दुकानावर महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. ही कारवाई वनराज आंदेकर यांच्या सांगण्यावरून केल्याचा संशय होता, तसेच संजीवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर व प्रकाश कोमकर कुटुंबीयांचे वनराज आंदेकर याचे कुटुंबीयांबरोबर मालमत्तेवरून वाद सुरू होते.
२०२३ मध्ये आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर व इतरांनी सोमनाथ सयाजी गायकवाड याच्या टोळीतील सदस्य निखिल आखाडेचा खून केला होता. या दोन्ही कारणांवरून टोळीप्रमुख सोमनाथ गायकवाड, संजीवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर व प्रकाश कोमकर यांनी इतरांसह कट रचून १ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजता आंदेकर यांच्यावर आकाश म्हस्के, विवेक कदम, तुषार कदम, समीर काळे यांनी गोळीबार करून खून केला.
या गुन्ह्यातील ७ पिस्तूल, १३ जिवंत काडतुसे, ७ कोयते जप्त करून ७ दुचाकी व ३ चारचाकी वाहने जप्त केली. या गुन्ह्यात एकूण ३९ साक्षीदार तपासले आहेत. एकूण २१ आरोपींना अटक केली असून, दोन अल्पवयीन ताब्यात आहेत. या २१ जणांवर १७०० पानी दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, पोलीस हवालदार विनोद शिंदे, अण्णा माने यांनी केली आहे.




