पुणे – तब्बल ६५ ते ७० टक्के झोपडपट्टी असलेल्या या प्रभागात गेल्या दोन दशकांपासून झोपडपट्टी पुनर्वसन (एसएआर) रखडलेले आहे. याशिवाय वाहतूक कोंडी आहेच. नागझरी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे व्यावसायिक, तसेच कष्टकऱ्यांच्या घरांचे होणारे नुकसान, तसेच जागोजागी साचलेल्या कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्या आजही कायम आहेत. शहरातील वेगवेगळ्या जाती- धर्माचे लोक असलेला काॅस्मोपाॅलिटन मतदार संख्या असलेला हा प्रभाग कसबा आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघांत विभागला आहे. प्रत्येक महापालिका निवडणुकीत या मतदारसंघाने भाजप आणि काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीला सामोरे जाताना या समस्यांवर तोडगा काय, याचे उत्तर या प्रभागातील इच्छुकांना मतदारांना द्यावे लागणार आहे. शहराचा पूर्व भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रभागात लोहियानगर, काशेवाडी, डायसप्लाॅट, चुडामन तालीम या झोपडपट्टीचा मोठा भाग आहे. त्यामुळे या परिसरात कष्टकरी वर्गाची संख्या अधिक आहे. याशिवाय, भवानी पेठ, टिंबर मार्केटचा काही भाग, तसेच गंज पेठ असा हा प्रभाग विस्तारलेला आहे. त्यामुळे या भागात व्यापारी आस्थापनांची संख्याही मोठी आहे. मात्र, त्या तुलनेत या भागातील रस्ते अरुंद असल्याने वर्षभर या पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याशिवाय दाट लोकवस्तीचा भाग असल्याने, तसेच नागरी सुविधांसाठी आवश्यक आरक्षित जागा नसल्याने या भागात पायाभूत सुविधांचीही मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. या प्रभागातून नागझरी नाला जातो. त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याने नाला अरुंद झाला आहे. याशिवाय अनेक ठिकाणी नाला बंदिस्त करून त्यावरच घरे बांधली आहेत. झोपडपट्टी परिसरात नाल्यालगत असलेल्या ड्रेनेज वाहिन्यांवरच घरे बांधली असल्याने पावसाळ्यात या ड्रेनेजचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते. नाल्यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे दरवर्षी या भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती उद्भवत असून, व्यावसायिकांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. दुसरीकडे हा भाग दाट लोकवस्तीचा असल्याने येथील कचरा समस्याही गेल्या काही वर्षांत गंभीर बनली आहे. झोपडपट्ट्यांमध्ये घरोघरी जाऊन कचरा संकलनाची सुविधा नसल्याने प्रभागात अनेक ठिकाणी कचऱ्याचे क्राॅनिक स्पाॅट मोठ्या प्रमाणात आहेत. या अस्वच्छतेमुळे नागरिकांना वर्षभर आजारांचा सामना करावा लागतो. गंज पेठ परिसरात मोठ्या प्रमाणावर जुने वाडे असून, या भागात जागामालक आणि भाडेकरूंच्या वादात मोडकळीस आलेल्या घरांचा पुनर्विकास रखडल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन धोकादायक अवस्थेत राहात आहेत. एसआरएचा प्रश्न कधी मार्गी लागणार? येथे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या असल्याने २००७ मध्ये पहिली एसआरए योजना झाली. आणखी एसआरए योजना प्रस्तावित आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ चार ते पाच एसआरए योजना झाल्या. त्यात केवळ २ ते अडीच हजार घरांचेच पुनर्वसन झाले आहे. लोहियानगर, डायसप्लाॅटमध्ये या योजना प्रस्तावित झाल्या. मात्र, पुढे जागांचे वाद, राजकीय हस्तक्षेप, विकसकांकडून केला जाणारा उशीर यामुळे अनेक योजना दहा दहा वर्षे प्रलंबित राहिल्या आहेत. झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठीची योजना केवळ कागदावर उरली आहे, तर या योजना मार्गी लावण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडून विशेष इच्छाशक्ती दाखविली नाही. वाहतूक कोंडीचा विळखा सुटणार कधी ? या प्रभागातील नेहरू रस्ता वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेला आहे. या रस्त्याचे महापालिकेकडून रुंदीकरण झालेले असले, तरी राजकीय आशीर्वादाने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहन विक्रेते आणि इतर व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे पुणे स्टेशन ते स्वारगेटला जोडणाऱ्या या रस्त्यावर जवळपास १६ ते १७ तास वाहतूक कोंडी असते. त्यातच या भागात जड वाहनांची वर्दळ अधिक असल्याने वारंवार अपघातांचा सामनाही नागरिकांना करावा लागतो. असे आहे राजकीय चित्र कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या या प्रभागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्याने अनेक वर्षे या भागात काँग्रेसचे प्राबल्य होते. २०१२ मध्ये या प्रभागातून काँग्रेसचे अविनाश बागवे आणि राष्ट्रवादीच्या हीना मोमीन निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत चार सदस्यांच्या या प्रभागात भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील आणि मनीषा लडकत या निवडून आल्या, तर काँग्रेसचे अविनाश बागवे आणि रफिक शेख हे निवडून आले. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या प्रभागात भाजपचे मताधिक्य असले, तरी लढत मात्र काँग्रेस आणि भाजपमध्येच होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास भाजपचा कस लागणार आहे. प्रचारात हे मुद्दे ठरतील महत्त्वाचे – रखडलेल्या एसआरए योजना – नेहरू रस्त्यावरील वाहतूक कोंडी – महापालिकेच्या पायाभूत सोयींचा अभाव – नागझरी नाल्यावरील अतिक्रमणे – पावसाळ्यात घरांमध्ये घुसणारे ड्रेनेजचे पाणी – जुन्या घरांचा पुनर्विकास – पावसाळ्यात भवानी पेठ, टिंबर मार्केटमधील पूरस्थिती – प्रभागातील कचरा संकलनाची समस्या – व्यावसायिकांसाठी पार्किंगची समस्या अशी आहे इच्छुकांची स्थिती भाजप- अर्चना पाटील, मनीषा लडकत, संदीप लडकत, दिनेश रासकर, सुखदेव अडागळे, मृणाल कांबळे, छगन बुलाखे, चेतन चावीर, विकी ढोले. महाविकास आघाडी– अविनाश बागवे, रफिक शेख, शहानूर शेख, इंदिरा बागवे, सादिक लुकडे, जावेद खान, जुबेर शेख, योगेश पवार, युसूफ शेख, कणव चव्हाण. राष्ट्रवादी काँग्रेस – महेश गायकवाड, विक्रम मोरे, शांतिलाल मिसाळ, नरेश जाधव. रिपाइं – रोहित कांबळे, लियाकत शेख, अशोक शिरोळे, संदीप धांडोरे, राजेश गाडे. महापालिकेच्या माध्यमातून प्रभागातील सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रभागातील झोपडपट्टी पूनर्वसन (एसएआर) समस्या सोडविण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून राजकीय इच्छाशक्ती दाखविली जात नाही, हे दुर्दैव आहे. – अविनाश बागवे, माजी नगरसेवक प्रभागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी रामोशी गेट ते कल्याण सोसायटीपर्यंत ग्रेडसेपरेटर करणे, हे माझे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. – अर्चना पाटील, माजी नगरसेविका.