पुणे – कामावरून तसेच कामाच्या पेमेंटवरून कामगाराला ठेकेदाराने पहिल्या मजल्यावरून फेकून दिले. ही घटना वडगाव खुर्द येथील व्योमकेश हाइटमध्ये घडली. याप्रकरणी दोघांना सिंहगड पोलिसांनी अटक केली.
संजय मुरलीधर तुंबर (46) आणि रामचंद्र किसन वाघचौरे (36, रा.वाघोली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. फिर्यादी मंतसीर हासीफ आलम (21) याचा सहकारी जुनेद याला आरोपी बांधकाम साइटवर कामावरून व पेमेंटवरून मारहाण करीत होते. यावेळी फिर्यादी आलम हा “तुम्ही कामाबाबत आमच्या ठेकेदाराशी बोला’ असे बोलला. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला मारहाण करत जिन्याने ओढत पहिल्या मजल्यावर नेले. तेथे पुन्हा मारहाण केली.
यानंतर जिवे मारण्याच्या उद्देशाने खाली फेकून दिले. संबंधित इमारतीच्या कामाचा ठेका आरोपींनी घेतला आहे. तर, फिर्यादी दुसऱ्या एका ठेकेदारामार्फत तेथे काम करतो. पोलीस उपनिरीक्षक खेडकर तपास करत आहेत.