Pune: शहर अडकले, सायबर चोरट्यांच्या जाळ्यात

पुणे – पुणे शहरात सायबर चोऱ्या, फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. नेहमीचेच फंडे वापरले जात असतानाही नागरिक चोरट्यांचा जाळ्यात फसत आहेत. सायबर चोरट्यांकडून उच्चशिक्षित बरोबर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केलं जात आहे. कमी वेळेत पैसे, पार्ट टाईम जॉब, मनी लॉन्डरिंगचा आरोप अशी विविध कारणे सांगून फसवणूक करत असल्याचे चित्र आहे. सायबर चोरटयांनी ७ जणांची ९१ लाख ९८ हजार ९८२ रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाला एनपीसीआय फाईलची रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून २५ लाख ६९ हजार २९७ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सेनादत्त पेठ येथे रहाणाऱ्या ७२ वर्षीय व्यक्तीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संपर्क करणाऱ्या करणदीप आणि मित्तल यांच्यवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२२ ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या काळात ही घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक घोडके तपास करत आहेत.
शेअर ट्रेडिंगचे आमिष
शेअर मार्केट मधून नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेची २२ लाख ५ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी उंड्री येथे रहाणार्या ४८ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.सायबर चोरट्याने फिर्यादी महिलेशी संपर्क करून अनुराग ठाकूर बोलत असल्याचे सांगितले. यानंतर फिर्यादी महिलेला स्टॉक ट्रेडिंग मध्ये पैसे कमवायचे आमिष दाखवून केकेआरसीए अप्लिकेशन डाऊनलोड करायला लावून पैसे पाठवायला लावून फसवणूक केली आहे.
मनी लॉन्डरिंग अटकेची भीती दाखवून
तुमच्या नावाने एक मोबाइल क्रमांक रजिस्टर असून त्याद्वारे मनी लॉड्रींग केल्याच्या आरोपावरून मुंबई येथे एफआयआर रजिस्टर असल्याचे खोटे सांगुन सुप्रीम कोर्टाची लिंक आहे, असे सांगुन त्यावर कोर्टाच्या व सीबीआयच्या फिर्यादी यांना अटक करण्याच्या ऑर्डर्स असल्याचे सांगत फिर्यादी यांच्या बँक खात्यातील रक्कम ही मनी लॉड्रींग मधील आहे का हे तपासण्यासाठी २० लाख पाठवायला सांगून फसवणूक करण्यात आल्याची फिर्याद ३५ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात दिली आहे.
पार्सल मध्ये ड्रग्स
मुंबई ते इराण दरम्यान तुमच्या नावाने ड्रग्स पाठवण्यात येत असल्याचे सांगून अमनोरा येथे राहणाऱ्या ५८ वर्षीय महिलेची ७ लाख ८५ हजार ६७७ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तसेच कोंढवा भागात राहणाऱ्या ४४ वर्षीय इसमालाचीही सायबर चोरट्याने अशाच प्रकारे फसवणूक करीत ७ लाख ३ हजार रूपये उकळले, याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
शेअर मार्केट नफ्याचे आमिष
शेअर मार्केट मधून नफा मिळवून देण्याच्या आमिषाने धनकवडी येथील २८ वर्षीय तरुणीची ८ लाख ३६ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तसेच, कॅन्टीन मधील कामगार बोलत असल्याचे सांगून सायबर चोरटयांनी आळंदी रोड इथे राहणाऱ्या एका व्यक्तीची ९५ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे.




