Pune : भ्रष्टाचाराची कीड रोखण्याचे आव्हान

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह तीन वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गजानन पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अडीच महिन्यांतच लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामुळे पाटील यांच्यापुढे जिल्हा परिषदेतील पारदर्शक कारभार करण्यासह भ्रष्टाचाराची कीड रोखण्याचे आव्हान आहे.
ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत गाव, वाड्या-वस्त्यांपासून ते तालुक्यापर्यंत सर्वच नेते स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा नेहमीच राबता असतो. केंद्र व राज्य सरकारकडून येणाऱ्या निधीचा ओघ जिल्हा परिषदेमार्फत गावात येत असल्याने अनेक विकासकामे तळागाळात रुजली आहेत. जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, महिला बालविकास, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन आदी महत्त्वाचे विभाग आहेत. यातील सर्वात मलईदार विभाग हा बांधकाम विभाग आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम विभागाची पाचही बोटे तुपात आहेत. गावपातळीपर्यंत झिरपणारा निधीचा स्त्राेत हा या विभागातून जातो. कोट्यवधींचा निधी आल्यानंतर अधिकारी तालुकानिहाय विभागणी करतात. मात्र, त्याचबरोबर ठेकेदाराला काम मिळाल्यानंतर त्यातील टक्केवारीचा वाटा हा अधिकाऱ्यांपर्यत बिनबोभाटपणे पोहोचतो. त्यानंतर सुरू असलेल्या कामाची पाहणी केल्यानंतर उर्वरित बिलासाठी ठेकेदाराकडून पाठपुरावा केला जातो. बिल मंजुरीचा टक्का हा दोन टक्क्यांपासून दहा टक्क्यापर्यंत गेला आहे. यात बांधकाम विभागातील लेखनिकपासून अधिकाऱ्यापर्यंत अशी अभेद्य साखळी आहे. यामध्ये ठेकेदाराला ग्रामपंचायतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांचाही वाटा ठेवावा लागतो.
प्रशासन राजमुळे भ्रष्टाचाराला खतपाणी?
गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेत तीन वर्षांपासून जिल्ह्याचा कारभार प्रशासक हाकत आहे. झेडपी गट व पंचायत समिती गणाला कोणी वालीच नाही. त्यामुळे सत्तेचे दोर अधिकाऱ्यांच्या हातात असल्याने सर्व विभागांत ‘अधिकारी’ राज दिसत आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी सुसाट सुटल्याची चर्चा सुरू आहे.
आव्हान पेलणार कसे
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. पाटील यांचा गावगड्याशी ॠणानुबंध असून, ग्रामीण भागाची पुरेपूर जाण आहे. त्यामुळे पाटील यांनी प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्याची गरज आहे. अजूनही मोठे मासे झेडपीत ठाण मांडून आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. हे आव्हान पाटील कसे पेलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





