पुणे : आयुष्यभर पुणे महापालिकेच्या बससेवेसाठी वाहिलेल्या बाबू मुन्ना तांबोळी या निवृत्त चालकाचा मृतदेह विश्रांतवाडी बस थांब्यावर बेवारस अवस्थेत सापडला. दोन तासांहून अधिक काळ मृतदेह तसाच पडून होता, तरीही नातेवाइकांनी दखल घेतली नाही. उलटपक्षी, रक्ताचं नातं नसलेले अब्दुल अजिज शेख यांनी माणुसकीचं नातं निभावत सर्व खर्चाची जबाबदारी स्वीकारली. तांबोळी मागील दीड वर्षांपासून बस थांब्यावर राहत होते. त्यांची पत्नी आणि एक मुलगा वारलेले असून, सध्या त्यांना एक विवाहित मुलगी व एक मुलगा आहे. घरच्यांशी विसंवादामुळे त्यांनी बसथांबाच आपलं घर केलं होतं. त्यांच्या दुःखद मृत्यूनंतरही नातेवाइकांनी मृतदेहाचा स्वीकार न करता, केवळ कागदपत्रांच्या चौकशीत रस दाखवला. विशेष म्हणजे, मृत्यूच्या आदल्या दिवशीच नात पेन्शनचे पैसे घेऊन गेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू मुन्ना तांबोळी असे मृताचे नाव आहे. ते मागील दीड वर्षापासून विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बस थांब्यावर राहत होते. त्यांची ही अवस्था पाहून समोरच चिकनचे दुकान असलेल्या अब्दुल अजिज शेख यांनी त्यांना रात्रीचा आसरा दिला. ते मागील दीड वर्षे त्यांच्या दुकानाबाहेर झोपत होते. त्यांना काय हवे नको याची विचारणाही शेख यांच्याकडून केली जात होती. तांबोळी हे दिवसभर बस थांब्यावर बसून राहत होते. त्यांची पेन्शनची रक्कम त्यांच्या बँकेत जमा झाली की, त्यांची मुलगी किंवा नात बस थांब्यावर येऊन त्यांना बँकेत घेऊन जात असे. तेथून त्यांची पेन्शन काढून पुन्हा बस थांब्यावर आणून सोडत असे. मागील दीड वर्षे असाच क्रम सुरू होता. दरम्यान, आज सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास तांबोळी बस थांब्यावर निपचित पडलेले शेख त्यांना दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता, त्यांची काहीच हालचाल दिसली नाही. त्यांनी तातडीने विश्रांतवाडी पोलिसांना याची खबर दिली. घटनास्थळी पोलीस अंमलदार वर्षाराणी शिंदे आणि ए. एम. माळी दाखल झाले. त्यांनी त्यांच्या कागदपत्रांवरून घरच्यांना फोन करून माहिती दिली. मात्र, एक-दीड तास होऊनही घरचे कोणीच दाखल झाले नाही. यानंतर घरच्यांना अनेक फोन केले गेले मात्र एकही फोन उचलला गेला नाही. पोलिसांनी अग्निशमन दल व इतर सरकारी रुग्णवाहिकांसाठी फोनाफोनी केली मात्र रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. खासगी रुग्णवाहिका मागितली तर त्याचा खर्च कोण करणार? हा प्रश्न होता. दरम्यान, शेख यांनी खर्चाची जबाबदारी स्वीकारली, त्यांनी खासगी रुग्णवाहिका बोलावून घेतली. इतकेच नव्हे तर ससूनमध्ये पोलिसांसोबत थांबत इतर कागदपत्रांचा खर्चही उचलला. या कागदपत्रांवर जबाबदार व्यक्ती म्हणून शेख यांचेच नाव लागले. मृताचे शवविच्छेदन झाल्यावर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला. बाबू तांबोळी हे मागील दीड वर्षे बस थांब्यावरच राहत होते. त्यांना एक मुलगा आणि विवाहित मुलगी आहे. त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला असता ते अद्याप पोलीस ठाण्यात आले नाहीत. मात्र, तांबोळी यांचे शवविच्छेदन केल्यावर त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. – कांचन जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी)