पुणे : मेट्रो स्टेशनवरून मार्गिकेवर जाऊन बेकायदेशीररित्या प्रवेश करून आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता नरेंद्र पावटेकर याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत, त्यांनी मागील तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कुठल्याच आंदोलनात आणि कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये आज त्यांनी पुणे मेट्रोच्या विरोधामध्ये आंदोलन केले आणि आंदोलन केल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणे त्याचबरोबर एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे या गोष्टी केल्या आहेत. निश्चितच या सर्व गोष्टी निषेधार्य आहेत, असे जगताप यांनी म्हटले आहे. आजचे त्यांचे आंदोलन ही वैयक्तिक असून, त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, आणि एकूणच पुणेकरांची आडवणूक करणे आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालणे या सर्व प्रकाराबाबत पक्षाचा काहीही संबंध नाही. त्यांच्या या सर्व गोष्टी विचारात घेता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे, असे जगताप यांनी सांगितले. दरम्यान पावटेकर याने शाळा आणि शिक्षणसंस्थांचा चाललेला व्यावहारिक बाजार थांबला पाहिजे या मागणीसाठी आणि बेरोजगारी यासाठी हे आंदोलन केले होते.