Pune : चांदणी चौकात भीषण अपघात

पुणे : चांदणी चौकात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. कोथरूडच्या दिशेने येणाऱ्या पीएमपीएल बसचा ब्रेक अचानक फेल झाल्याने बसने वेगाने येत तीन दुचाकी, एक कार आणि दोन रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोथरुड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदणी चौकातून खाली उतरताना बसचा ब्रेक अचानक निकामी झाला. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. अपघात घडलेली बस प्रवासी घेऊन चाललेली नव्हती. ती बालेवाडी डेपोची बस असून कोथरुड डेपोला सीएनजी भरण्यास चालली होती. बस खासगी ठेकेदाराची आहे.
अपघातामुळे रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींमध्ये दुचाकीस्वार आणि रिक्षा चालकाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. वाहतूक नियंत्रित करून परिस्थिती हाताळली. पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. बसच्या तांत्रिक स्थितीचीही तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, बसचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
अपघातात तीघे जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून वाहतूक तातडीने सुरळीत करण्यात आली आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
– संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन





