Pune Temperature – शहरासह उपनगरातील उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशीच्या पुढे मजल मारली आहे. शनिवारी (दि. ११) दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्याने पुणेकर गेघामाघूम झाले. लोहगावला सर्वाधिक ४०.६ तर शिवाजीनगर येथे ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सलग दुसऱ्या दिवशी शहरातील कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ झाली. त्यामुळे ३७ अंशावर असलेले कमाल तापमान आज ४० अंशाच्या पुढे ले. मागील आठ दिवसांपासून पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाचा हलकासा चटका जाणवत होता. मागील दोन दिवसांत सातत्याने कमाल तापमानात वाढ होत असून, आज किमान तापमानातही लक्षणीय वाढ झाली. परिणामी पहाटेचा गारवा काहीसा कमी झाला असून, सकाळी अकरा वाजल्यापासूनच शहरासह उपनगरात उन्हाचा चटका जाणवत होता. लोहगाव, शिवाजीनगर, मगरपट्टा, कोरेगाव पार्क, विश्रांतवाडी, हडपसर यासह जिल्ह्यातील काही भागात उन्हाच्या चटक्याने अंगाची लाहीलाही झाली. उकाड्याने पुणेकर घामाघूम झाले. दरम्यान, पुढील दोन दिवसात शहरासह जिल्ह्यातील आकाश निरभ्र तर हवामान कोरडे राहील. कमाल व किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली असून, उन्हाचा पारा पुन्हा तापवणार असे दिसते. लोहगाव ४०.६, शिवाजीनगर ३९, चिंचवड ३८.६, मगरपट्टा ३८.६, कोरेगाव पार्क ३९.२, एनडीए ३७.७ अंश सेल्सिअस