शासनाच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करा – अजित पवार पुणे – महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांतील मिळकतकर आकारणीबाबत शासनाने यापूर्वी दिलेल्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी. तसेच, मिळकतकराचे पुनर्विलोकन होईपर्यंत सक्तीच्या कर वसुलीस स्थगिती कायम ठेवावी, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती कक्षात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, नगरविकास विभागाच्या सहसचिव सुलेखा वैजापूरकर, उपसचिव प्रियंका छापवाले, ३२ गावे कृती समितीचे राहुल पोकळे, नितीन दांगट, अरुण दांगट, राहुल पायगुडे हे मंत्रालयातून उपस्थित होते. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तसेच नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (पुणे) रवींद्र बिनवडे हे ऑनलाइन सहभागी झाले होते. गुंठेवारी होणार सुलभ ग्रामपंचायत काळात केलेल्या बांधकामांची दस्तनोंदणी मोठ्या प्रमाणात रखडलेली आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी दस्तनोंदणीसाठी प्रमाणित कार्यप्रणाली आजच जारी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. गुंठेवारी प्रक्रिया सरसकट, सोपी आणि कमी खर्चिक करावी. तसेच ‘अभय योजना’ केवळ जुन्या हद्दीतील गावांनाच लागू करावी, अशीही सूचना त्यांनी केली. विकास आराखडे मंजूर होईपर्यंत समाविष्ट गावांमध्ये बांधकामांवर होणारी अतिक्रमण कारवाई स्थगित ठेवावी. समाविष्ट गावांतील डीपी रोड संदर्भातील कार्यवाही तातडीने करावी. सविस्तर प्रकल्प आराखडे लवकर मंजूर करावेत. प्रत्येक गावासाठी पाच कोटी रुपयांपर्यंतचा निधी रस्ते, ड्रेनेज, वीज, पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण प्रकल्प अशा मूलभूत सुविधांसाठी वापरावा. ३२ गावांसाठी एकूण १६० कोटी रुपयांची विकासकामे तातडीने सुरू करून त्यांना गती द्यावी, अशा सूचना महापालिकेला देण्यात आल्या. तसेच, समाविष्ट गावांतील मुख्य रस्त्यांची दुरुस्ती करावी, महापालिकेची सायनेज बोर्ड लावावीत, डिव्हायडर बसवून त्यांना रंगरंगोटी करावी, स्वच्छता व कचरा संकलनावर विशेष भर द्यावा. पाणीपुरवठ्याची तात्पुरती सोय करावी आणि आवश्यक तेथे टँकर उपलब्ध करावेत, असे आदेशही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.