पुणे -पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ठेकेदारांनी थकीत रक्कम देण्यासाठी रविवारी अचानक संप करत, प्रवाशांना वेठीस धरले होते. रविवारी संपामुळे केवळ 40 ते 45 टक्केच बस मार्गांवर धावत होत्या. तर सुमारे 900 बस बंद होत्या. अनेक मार्गांवर बस नसल्यामुळे नागरिकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय झाली आहे. पीएमपीकडून पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील 369 मार्गांवर बस सेवा दिली जाते. पीएमपीच्या दररोज सुमारे 1800 पेक्षा अधिक बस प्रवाशांच्या सेवेत असतात. यातील एक हजारहून अधिक बस या ठेकेदारांच्या तर 600 ते 700 बस या पीएमपीच्या मालकीच्या आहेत. रविवारी पीएमपीच्या ऍन्थोनी, हंसा, ट्रव्हल टाईम आणि ओलेक्ट्रा या चार ठेकेदारांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे रविवारी दुपारी तीननंतर मार्गावर केवळ 40 ते 45 टक्के बस धावत होत्या. रविवार असल्यामुळे अनेक नागरिक खरेदीसाठी किंवा इतर कामानिमित्त बाहेर पडले होते. पण, बस बंद असल्यामुळे त्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. पीएमपीत ठेकेदारांच्या गाड्या अधिक असल्यामुळे पुन्हा एकदा ठेकेदारांनी विविध मागण्यासाठी बंद ठेवून प्रवाशांना वेठीस धरले. पीएमपी प्रशासनाने इतर दोन ठेकेदारांनी संपात भाग घेतला नसल्यामुळे पीएमपीच्या स्वमालकीच्या आणि ठेकेदारांच्या 791 बस मार्फत सेवा सुरू होती. पण, अनेक मार्गांवर प्रवाशांना बससाठी एक ते दीड तास थांबावे लागले. रविवारमुळे कार्यालये, शाळा आणि कॉलेज बंद होते. त्यामुळे नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टळली. मात्र, संप सुरूच राहिला तर सोमवारपासून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. “मेस्मा’ लावणार का ? पीएमपी ठेकेदारांनी अचानक बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न दिल्यामुळे पीएमपी प्रशासन मेस्मा अंतर्गत ठेकेदारांवर कारवाई करणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. संप सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांना फटका सोमवारी होळी आणि मंगळावारी धुलिवंदन असल्यामुळे अनेक नागरिक फिरायला जाण्यासाठी बाहेर पडतात. तसेच दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा सुरू आहे. ठेकेदारांनी संप केल्यामुळे सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थांना बसणार आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांनी पेपरसाठी घरातून लवकर निघण्याचे आव्हान पीएमपी प्रशासनाने केले आहे. ठेकेदारांच्या बसचे पैसे थकले आहेत. आम्ही स्वमालकीच्या आणि इतर दोन ठेकेदारांच्या बसच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. – ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष, पीएमपी