Pune : कसब्यात भुयारी मार्गातून वाहतूक

पुणे : शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन महत्त्वाकांक्षी भुयारी मार्गांच्या प्रकल्पांना गती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या भुयारी मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले.
कसबा मतदारसंघात प्रमुख बाजारपेठा तसेच धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तू असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत असते. या भुयारी मार्गांच्या माध्यमातून वाहतुकीला गती मिळेल तसेच इंधनाचीही बचत होईल. दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्त्यांमुळे या भागात उड्डाणपुलाचा पर्याय शक्य नसल्याने आम्ही भुयारी मार्गांची संकल्पना पुढे आणली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून याबद्दलचे सविस्तर निवेदन देण्यात आले होते. आता, सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याची सूचना केल्याने भुयारी मार्ग निर्मितीला गती मिळणार आहे, असे रासने यांनी सांगितले.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, सदाशिव साळुंखे, उपसचिव प्रज्ञा वाळके, बी.एस. तेलंग, अव्वर सचिव प्रभाकर लहाने, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, स्वीय सचिव सुधाकर भोसले आदी उपस्थित होते.





