Pune : विद्यार्थ्यांना पहिल्याच वर्षी पेड इंटर्नशिपची संधी

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाने २०२४ या शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी ब्लॉकचेन टेक्नोलॉजी या पदवी अभ्यासक्रम सुरु केली आहे. यातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अॅक्सेलचेन या कंपनीकडून ब्लॉकचेन प्रोजेक्टवर पेड इंटर्नशिपची संधी मिळाली आहे. पहिल्या फेरीत १२ विद्यार्थ्यांची या प्रकल्पांसाठी निवड करण्यात आली असून, इनोव्हेटिव आयडिया या संकल्पनेंतर्गत ब्लॉकचेन टेक्नोलॉजीवरील प्रोजेक्ट तयार केले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्याच्या महत्वकांक्षी हेतूने विद्यापीठाने बी.एस्सी ब्लॉकचेन टेक्नोलॉजी या अभ्यासक्रमाची सुरूवात केली होती. ते उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल असल्याची भावना विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी व्यक्त केली. या वर्षीच्या बी. एस्सी ब्लॉकचेन टेक्नोलॉजी पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज सुरु झाले आहेत.
दरम्यान, विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. सुरेश गोसावी म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. सध्याच्या काळात डेटा सिक्युरिटीच्या बाबतीत ब्लॉकचेन टेक्नोलॉजी महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. विद्यार्थ्यांचा या तंत्रज्ञानाकडे वाढता कल त्यांच्या करिअरच्या दृष्टीने योग्य पर्याय ठरेल.




