पुणे – राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभाग, विद्यापीठ आवारातील आयुका, राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, सायन्स पार्क, आयसर, राष्ट्रीय केमिकल प्रयोगशाळा, भारतीय हवामान विभागासह अन्य वैज्ञानिक संस्थांमध्ये प्रदर्शन व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह विज्ञानप्रेमींनी भेट घेत वैज्ञानिक प्रकल्पांची माहिती घेतली. पुणे विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात प्राणी व पक्षी यांच्या जतन केलेल्या नमुन्यांचे प्रदर्शन भरवले होते, तर लहान मुलांसाठी गमतीशीर खेळ आयोजित केले होते. तसेच विद्यार्थ्यांनी अनेक प्रकल्पही सादर केले होते. मानवशास्त्र विभागाच्या इरावती कर्वे संग्रहालयात मानवी उत्क्रांतीमधील जीवाश्म विज्ञान आणि मानवी अस्थी याबाबत माहिती देण्यात आली त्यासोबतच संग्रहालयाची सफर घडवून आणण्यात आली. वनस्पती शास्त्र विभागाने जैवविविधता, कंपोस्टचे महत्व, औषधी वनस्पती, भरड धान्य आणि त्याची उपयुक्तता, ग्रीन हाऊस मॉडेल याची माहिती देत विज्ञान दिवस साजरा केला. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने प्रयोगशाळा सर्वांसाठी खुली ठेवली होती. काही संवादात्मक कार्यक्रम, पोस्टर प्रदर्शन भरवले होते. त्याचप्रमाणे सायन्स पार्क, भौतिकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, रसायनशास्त्र, गणित विभाग आदींनी देखील विविध उपक्रम या निमित्ताने घेत विज्ञान दिवस साजरा केला. विज्ञान दिवसानिमित्त सायन्स पार्क येथे मानवी रक्ताभिसरण संस्था प्रोजेक्शन मॅपिंग शोचे औपचारिक अनावरण करण्यात आले. त्यासोबत विद्यार्थ्यांसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले आणि विज्ञान पत्रिकेचेही विमोचन करण्यात आले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत मंगळवारी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पुणे विद्यापीठ वनस्पतीशास्त्राच्या प्रा. अंजली कुलकर्णी उपस्थित होत्या.