महापालिकेला तब्बल २०० कोटींच्या निधीची आवश्यकता पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी असलेली भटकी कुत्री पकडून त्यांच्यासाठी निवारे उभारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरात शासनाकडून निश्चित केलेल्या सुमारे २ हजार ८४३ ठिकाणी एक ते सव्वा लाख भटकी कुत्री असून, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेला दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार असल्याचा प्राथमिक आराखडा समोर आला आहे. या निवारा केंद्रांसाठी किमान ३ ते ५ एकर जागेची आवश्यकता शहराच्या चारही दिशांना असणार आहे. या पुनर्वसनात त्यांना पकडून आणण्यासह त्यांचे निर्बीजीकरण, राहण्यासाठी इमारती, दवाखाना, दोन वेळच्या जेवणाची सुविधा, त्यांना पकडण्यासाठी स्वतंत्र वाहने, निवाऱ्यांसाठी कर्मचारी, डॉक्टर अशा वेगवेगळ्या कामांसाठी हा निधी आवश्यक आहे. पहिला निवारा बांधण्यासाठी प्रशासनाकडून भूगाव आणि शिंदेवाडी येथील जकात नाक्यांच्या जागांबाबत चाचपणी सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत राज्यातील भटक्या कुत्र्यांबाबत शासनाकडून अहवाल मागवला होता. त्यात राज्याच्या ग्रामीण भागात सात लाख नागरिकांना, तर महापालिका हद्दीत ५,९२० नागरिकांना चावा घेतल्याची नोंद आहे. श्वानदंशाचा आलेख वाढत असला, तरी उपाययोजनांबाबत पालिका उदासीन असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. अनेक महापालिकांची निर्बीजीकरण केंद्रे बंद असल्याने नियंत्रण कठीण झाल्याची नोंद घेऊन न्यायालयाने शासनाच्या कारभारावर टीका केली. त्यानंतर शासनाने ही जबाबदारी महापालिकांवर सोपवली आहे. या सुनावणीत महापालिकांना त्यांच्या हद्दीतील शैक्षणिक संस्था, खासगी रुग्णालये, सार्वजनिक रुग्णालये, क्रीडा संकुले, बस स्थानके, रेल्वे स्थानके अशा ठिकाणांची यादी करण्याच्या सूचना केल्या होत्या. वाढत्या संख्येचा प्रश्न शहरात केलेल्या सर्वेक्षणात सुमारे २८४३ ठिकाणी भटकी कुत्री असल्याचे दिसून आले आहे. प्राथमिक सर्वेक्षणात एक ते सव्वा लाख भटकी कुत्री असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. शहरात निर्बीजीकरणाचे काम होत असले, तरी लसीकरण आणि वाढती संख्या यात मोठी तफावत आहे. पूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केल्यानंतर त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडावे लागत होते. मात्र, सुधारीत आदेशानुसार त्यांना निवारा देणे बंधनकारक असल्याने पकडण्यापासून ते निवाऱ्यापर्यंत अनेक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. यापूर्वी महापालिकेने शहरात कुत्र्यांसाठी डॉग पाँड उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, स्थानिकांकडून त्यास विरोध झाला होता.