पुणे – वैद्यकीय महाविद्यालयासाठी बैठका सुरू

सल्लागारांना सर्व विभागांनी सहकार्य करावे : आरोग्य विभागाचे पत्र


‘आयएनआय डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड’ सल्लागार संस्थेची नेमणूक

पुणे – सलग दोन वर्षे अंदाजपत्रकात भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे प्रस्तावित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी अखेर महापालिकेकडून पावले उचलण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासनाने या महाविद्यालयासाठी निश्‍चित केलेल्या सल्लागाराला वर्क ऑर्डर दिली. त्यानंतरची पहिली बैठक नुकतीच आरोग्य विभागात पार पडली. या बैठकीत पुढील कामाचे प्राथमिक नियोजन ठरविण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. या महाविद्यालयासाठी “आयएनआय डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड’ या सल्लागार संस्थेची अखेर नेमणूक करण्यात आली आहे.

या वैद्यकीय महाविद्यालयासाठी 2018-19 च्या अंदाजपत्रकात 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर ही तरतूद यंदाच्या अंदाजपत्रकातही कायम आहे. मात्र, मार्च महिन्याच्या मुख्यसभेत माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या महाविद्यालयासाठी महापालिका आयुक्तच दिरंगाई करत असल्याची टीका केली होती. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ सल्लागार नेमला आहे. त्यानुसार, पुढील सात वर्षांत 10 टप्प्यांत हे काम केले जाणार आहे. या सल्लागाराची पहिली बैठक नुकतीच महापालिकेत पार पडली. यात महाविद्यालयासाठी लागणाऱ्या जागेवर चर्चा करण्यात आली.

त्यानुसार, नायडू हॉस्पीटलच्या परिसरात महापालिकेची सुमारे 42 एकर जागा असून त्यात वेगवेगळे प्रकल्प आहेत. तसेच, काही भागांत अतिक्रमणही आहेत. त्यामुळे सल्लागारांना नेमकी हवी असलेली माहिती महापालिकेकडून उपलब्ध व्हावी या उद्देशाने या जागेत ज्या विभागांचे कामकाज सुरू आहे. तसेच, ज्या विभागांकडे जागा आहे. त्यांच्याकडून माहिती तातडीने मिळावी यासाठी या सर्व विभागांना लेखी पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, “आयएनआय डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड’ या सल्लागार संस्थेची वैद्यकीय महाविद्यालयासाठी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आवश्‍यक असलेली माहिती तातडीें उपलब्ध करून द्यावी, असे पत्र बांधकाम, अतिक्रमण, भवन रचना, विद्युत, मध्यवर्ती भांडार विभागास पाठविण्यात आली असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.