पुणे : पुणे- दौंड- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेमू जुन्या झाल्या आहेत. तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणावरून त्या वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे विभागाने दोन मेनलाइन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट मेमूची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे. मात्र, पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपने डेमू किंवा मेमूऐवजी पुणे-दौंड उपनगर घोषित करून या मार्गावर लोकल (ईएमयू) सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ही लोकल सुरू झाल्यास नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल. व्यवसाय, शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने येथून अनेक जण पुण्यात येतात. त्यामुळे पुणे- दौंड दरम्यान दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दौंड, पाटस, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळी, लोणी, मांजरी, हडपसर हे पुण्याचा अगदी जवळ असल्यामुळे येथे राहणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे हडपसर येथील आयटी पार्क, हॉस्पिटल, इंडस्ट्रिअल विभाग, मांजरी येथील सिरम कंपनी, कॉलेज, लोणी येथील एमआयटी विद्यापीठ, उरुळी येथील प्रयागधाम, यवतमधील गूळ उत्पादक कारखाने, कुरकुंभ एमआयडीसी, एसआरपीएफ कॅम्प, दौंड नगरपालिका येथे कामाला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, या मार्गावर धावणाऱ्या डेमू व्यवस्थित चालत नाहीत, तसेच तिला सतत बाजूला करून दुसऱ्या गाड्यांना पुढे सोडले जाते. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुप सदस्य अभिषेक सोनवणे यांनी सांगितले, की पुणे ते दौंड दरम्यान उपनगरीय क्षेत्र घोषित करून लोकल सेवा चालू करण्यात यावी, ही आमची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. डेमू किंवा मेमूऐवजी लोकल (ईएमयू) चालवण्यात यावी. पुणे ते दौंड दरम्यानचे अंतर हे ७४ किलोमीटर आहे. सध्याच्या परिस्थितीत पुणे ते दौंड हा रेल्वे विभाग पूर्णपणे विद्युतीकरण झालेला आहे. या मार्गावर डिझेल गाडी चालत असल्याने गाडी वेळेत पोचत नाही. ऑफिस कामगार, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. याशिवाय डेमू, मेमू ही केवळ ८ ते १० डब्यांची आहे. या मार्गावर नेहमी गर्दी असते. महिला, दिव्यांग, गरोदर स्त्रियांसाठी स्वतंत्र डबा नसल्यामुळे त्यांचीही गैरसोय होते. ईएमयू सुरू केल्यास तिला १२ डबे असतील. त्यामुळे मार्गावर गर्दी कमी होण्यास मदत होईल.