विनाशेड प्रवाशांची गैरसोय : नियंत्रण कक्ष झालाय मद्यपींचा अड्डा
हडपसर – हडपसर येथील पुणे-सोलापूर महामार्ग आणि सासवड रस्त्यावर एसटी बसचे पिकअप शेड नाहीत. त्यामुळे प्रवाशांना भर उन्हात एसटी बसची वाट पाहत थांबावे लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पुणे शहरातील स्वारगेट व शिवाजीनगर एसटी बसस्थानकानंतर हडपसर उपनगर येथे स्वतंत्र एसटी बस स्थानक उभारण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. मात्र, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर स्वारगेट सोडल्यानंतर हडपसरपर्यंत एसटी बसचे एकही पिकअप शेड नाही. याशिवाय प्रवाशांची मोठी संख्या असलेल्या हडपसर उपनगरात एसटी स्थानकही नाही. पाटस, दौंड, भिगवण, करमाळा, राशीन, नगर, इंदापूर, बार्शी, तुळजापूर, उस्मानाबाद, सोलापूर, अक्कलकोट, लातूर याभागात जाणाऱ्या एसटी बसेस सोलापूर महामार्गावर अमर समृद्धी व रवी दर्शन या सोसायटींसमोर आकाशवाणी येथे रस्त्यावरच उभ्या राहतात. तर पंढरपूर, फलटण, सातारा, जेजूरी या भागात जाणाऱ्या एसटी बसेस सासवड रस्त्यावर उभ्या राहून प्रवाशी घेतात. मात्र याठिकाणी एसटी बसेसचे वेळापत्रक नाही.
प्रवाशांना थांबण्यासाठी शेड नाही. बसण्याची व्यवस्था नाही. सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. त्यामुळे प्रवाशांना भर उन्हात ताटकळत थांबावे लागते. विशेषत: ज्येष्ठ नागरिक व महिलांना याचा अधिक त्रास होत आहे. लहान मुले, वृद्ध प्रवासी देखील घामाघूम होत एसटी बसची वाट पाहात उभे असल्याचे दृश्य सोलापूर व सासवड येथील एसटी बसेसच्या थांब्यावर पाहावयास मिळत आहे. या भागात एसटीचे स्थानक नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
… अन् कारावा लागतो खासगी वाहनांनी प्रवास
दूर पल्ल्याच्या एसटी येण्यासाठी दोन-दोन तास वाट पाहवी लागत असताना येथे सार्वजनिक स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे. मात्र ते नसल्याने महिला प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे. याशिवाय कोणती एसटी कधी येईल याबाबत येथे माहिती मिळत नाही. त्यामुळे वाट पाहावून कंटाळल्यानंतर प्रवाशी जीव धोक्यात घालून खासगी वाहनांनी प्रवास करत आहेत. तेव्हा एसटी व पालिका प्रशासनाने याठिकाणी पिकशेडसहित अधिकृत थांबा तयार करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
नियंत्रण कक्षात मध्यपींचा अड्डा
एसटी विभागाने येथे एक नियंत्रण कक्ष ठेवले आहे. मात्र, त्यात कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी बसत नाहीत. त्यामुळे या कक्षात कोणतीही बसत आहे. येथे झाडाचा अडसर असल्याने या कक्षात काहीजण मद्यप्राशन करतात. मद्यपान केल्यानंतर मद्याच्या रिकाम्या बॉटल येथेच फेकून दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे वाहतूक नियमन करण्यासाठी या नियंत्रण कक्षा शेजारीच वॉर्डन व वाहतूक पोलीस उभे असतात.