मांजरी – प्रभाग क्रमांक १५ मांजरी- केशवनगर- साडेसतरानळी- शेवाळेवाडी परिसरात शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सुरुवात झाली. ठिकठिकाणी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे व माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपअण्णा घुले यांच्या नेतृत्वाखाली मांजरी येथील मांजराई देवी व केशवनगर येथील रेणुका माता मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दादासाहेब घुले व एकनाथ भंडारी यांच्या हस्ते उमेदवार राजश्री विकी माने, संदीप मारुती लोणकर, सीमा सुधीर घुले व नीलेश दिलीप घुले यांच्या प्रचार फेरीला प्रारंभ झाला. मार्गदर्शक नंदकुमार घुले, बाबासाहेब शिंगोटे, अंकुश घुले, विशाल ढोरे, अमर घुले, विजय कामठे यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवनगर येथून जोरदार घोषणाबाजी करत प्रचार फेरी निघाली. या वेळी उमेदवारांनी प्रभागाच्या विकासासाठी संधी देण्याचे आवाहन नागरिकांना केले.