पुणे -‘…तर, आमी मतदान करुचो नाय’

गावाला जायला रस्ता नाही, तर मतही नाही!


कोकणवासीय महासंघाचा मतदानावर बहिष्कार

पुणे – पुण्यातून कोकणात जाणाऱ्या मार्गाची अक्षरश: चाळण झाली असून, या समस्येकडे कोणाही राजकीय पुढाऱ्याला पाहायला वेळ नाही, त्यामुळे निषेध म्हणून लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय “कोकणवासीय महासंघा’ने घेतला आहे. तसे निवेदनही अध्यक्ष तुकाराम जाधव यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

पुणे स्थित कोकणवासीय महासंघातर्फे आठही विभागातील सर्व पदाधिकारी, सभासद आणि कार्यकर्ते यांच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील सर्व कोकणवासीय संघटनांनाही तसे कळवण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

पुण्यातून कोकणात जाणाऱ्या पुणे-भोर-महाड आणि पुणे-मुळशी-माणगाव या दोन्ही मार्गावरील रस्त्याच्या दूरवस्थेबाबत पुण्यातील आणि कोकणातील, संबंधित राजकीय नेते मंडळींना आणि संबंधित सर्व शासकीय दफ्तरी हे रस्ते दुरुस्ती करण्यासंदर्भात अनेक निवेदन देण्यात आली होती. परंतु आमच्या निवेदनांकडे कोणत्याही नेत्यांना किंवा सरकारी यंत्रणेला पाहण्याला वेळ नाही. या दोन्ही मार्गावर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे, अशी संघटनेची तक्रार आहे.

शिमगोत्सवासाठी पुण्यातून कोकणांत जाताना कोकणवासीयांचे खूप हाल झाले. याची कोणाला खंत ना खेद असल्याची परिस्थिती आहे. किरकोळ अपघात, वादविवाद ही तर नित्याचीच बाब झाली आहे. संबंधित राजकीय, शासकीय खाते, एखाद्या गंभीर जीवघेण्या अपघाताची वाट पाहात आहेत की काय, असा प्रश्‍न पडत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
सध्या मातीने खड्डे बुजवण्याचे म्हणजे तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे. याचे परिणाम पहिल्या पावसाळ्यात दिसतीलच. परंतु या रस्त्याचे डांबरीकरण कधी होणार? असा प्रश्‍न या निमित्ताने पडला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

कोकणात जाणाऱ्या सर्व घाट रस्त्यावर कठडे दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती या सर्व कारणास्तव शहरातील सुमारे तीन ते पाच लाख कोकणवासीय मतदान करणार नाहीत, असा इशारा या पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)