पुणे : पुणे व पिंपरी- चिंचवड परिसरात आतापर्यंत पुणे पोलिसांनी १४ एन्काउंटर केले असून, त्यामध्ये वेगवेगळ्या टोळ्या, नवीन उदयास येणाऱ्या १९ गुंडांचा खात्मा करण्यात आला आहे. ऑगस्ट २००९ मध्ये पुणे पोलिसांनी चांदणी चौकात गुंड राहुल कंधारे याचा केलेला एन्काउंटर हा शेवटचा होता. मात्र, पुणे जिल्ह्यात त्यानंतर तीन एन्काउंटर झाले आहेत. एखाद्या एन्काउंटरनंतर काही काळ गुन्हेगारीला लगाम बसलेला दिसतो. आता १६ वर्षांनी सोलापूरमध्ये पुणे पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील एन्काउंटरचा इतिहास तसा जुना आहे. लष्कर परिसरात २२ मे १९८३ मध्ये दोन गुंडांनी पोलिसांवर चाकू हल्ला केला होता. त्यामध्ये दोन पोलीस जखमी झाल्यानंतर पोलिसांनी लाठ्यांनी केलेल्या मारहाणीत राजू शेख व हिसामुद्दीन पठाण हे मरण पावले होते. हा पुण्यातील पहिला एन्काउंटर म्हणता येईल. कुख्यात गुंड जग्या म्हस्के याची १९९२ मध्ये पोलिसांसोबत चकमक उडाली होती. त्या वेळी पोलिसांच्या गोळीबारात जग्या मारला गेला. खऱ्या अर्थाने पोलिसांच्या गोळीबारात जग्याचा मृत्यू हा पहिला एन्काउंटर मानता येईल. वादाशिवायचे एन्काउंटर गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पुणे पोलीस दलात १९९५ मध्ये नव्याने दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलली. त्यांच्याकडून काही जणांचे एन्काऊंटर झाले. मे १९९२ मध्ये पुण्यातील कुख्यात गुंड सुरेश टकलेचा एन्काउंटर हा दुसरा एन्काउंटर म्हणावा लागेल. त्यानंतर खलील शेख, महंमद शेख हे काळेवाडीजवळ पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले गेले होते. त्याच वर्षी मेघराज शेट्टीचा वडगाव शेरी येथे एन्काउंटर झाला. एकाच वर्षात म्हणजेच १९९२ मध्ये एन्काउंटरच्या चार घटना घडल्या होत्या. यामुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. अनेक गुन्हेगार इस्टेट एजंट किंवा इतर जोडधंद्याकडे वळले. १९९५ च्या सुमारास शहरालगतच्या जमिनींना सोन्याचे भाव आले. यामुळे जमीन खरेदी- विक्री किंवा जबरदस्तीने जमिनी लाटण्यासाठी अनेक टोळ्या सक्रीय झाल्या. त्याचा परिणाम टोळ्यांतील वर्चस्व आणि त्यातून होणारे खून, खंडणीसारख्या घटनांत वाढ होण्यात झाला. जानेवारी १९९५ मध्ये अरुण गवळी टोळीतील किरण वालावलकर आणि रवी कारंजावकर यांचा पोलीस निरीक्षक सुरेश पोटे यांच्या पथकाने एन्काउंटर केला. कुख्यात गुंड प्रमोद माळदकरचा नोव्हेंबर १९९७ मध्ये काळेवाडीजवळ एन्काउंटर झाला. त्यानंतर २००१ मध्ये सुरेश मंचरकर टोळीतील तीन गुंड एन्काउंटरमध्ये मारले गेले. त्यानंतर दिलीप गोसावी, रोहिदास येवले, रमेश तावरे, राजेश चौधरी, बाबा गंडले, संजय शेळके, रॉबर्ट साळवे, संतोष ओव्हाळ हे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले. २५ ऑगस्ट २००९ मध्ये पुण्यातील चांदणी चौकात राहुल कंधारे याचा एन्काउंटर झाला होता. हा पुण्यातील शेवटचा एन्काउंटर होता. येरवडा कारागृहातून पॅरोलवर पसार झालेल्या मोबीन शेख व त्याच्या साथीदाराचा पुणे पोलीस आणि नवी मुंबई पोलिसांनी तळोजा परिसरात एन्काउंटर केला होता. पुणे शहरातील आजवरच्या इतिहासात आतापर्यंत एकही एन्काउंटर वादग्रस्त ठरला नाही, हे विशेष.