सिहंगडरस्ता –मुठा नदीत विसर्ग वाढवण्यात आला आहे. तेथे मासेमारी करणाऱ्या व्यक्तीला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो पात्रातच अडकला होता. त्याचा आरडाओरडा ऐकून युवकाच्या प्रसंगावधानामुळे हा व्यक्ती बचावला.
मुन्ना धानू राज, रा. शिवणे (व्यवसाय मजुरी, मूळ रा. सागर, मध्य प्रदेश) हा शिवणे नदीकाठी मासे पकडत होता. त्यावेळी नदीत अडकला होता. त्याने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी स्वामी समर्थ महाराज आणि महावतार बाबाजी मठ नांदेड सिटी येथे निर्माल्यापासून खत तयार करत असलेला 17 वर्षीय आर्य लगड हा धावत आला.
त्याने परिस्थिती लक्षात घेत तेथे असलेले रमेश दायमा, अनिल बेनकर, बापू बाबुराव ढेबे यांच्या मदतीने पाण्यात अडकलेल्या व्यक्तीची सुटका केली. आर्य हा नांदेड सिटीचे संचालक नरसिंग लगड यांचा मुलगा आहे. त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, सध्या नदीचा प्रवाह जास्त असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मठाचे मठाधिपती गुरूश्री यांनी केले आहे.