संजय कडू पुणे – पुणे शहरात कोयता गँग, टोळीयुद्ध आणि बेछूट हिंसाचारामुळे कायदा- सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. राज्यभरातून पुणे पोलिसांवर टीकेची झोड उठली होती. मात्र, गेल्या काही आठवड्यांत पोलिसांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे गुन्हेगारी जगतात चांगलीच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या बुलडोझर पॅटर्नवरून प्रेरणा घेत पुणे पोलिसांनी गुन्हेगारांच्या अवैध साम्राज्यावर आर्थिक घाव घालण्याचा निर्णय घेतला आहे. पुणेकर मागील आठवडाभर त्याची झलक पाहात आहेत. आंदेकर टोळीच्या बेकायदा बांधकामांवर सलग पाच दिवस बुलडोझर फिरवला गेला, तर टिपू पठाण टोळीचेही कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले. आता पोलिसांनी नीलेश घायवळकडे मोर्चा वळवला आहे. गुन्हेगारी टोळ्यांना आर्थिक धक्का आयुष कोमकर खूनप्रकरणी अटक केलेल्या आंदेकर टोळीच्या तब्बल १७ कोटी ९८ लाखांच्या मालमत्तेची जप्ती प्रक्रिया मोक्का कायद्याअंतर्गत सुरू झाली आहे. टोळीप्रमुख बंडू आंदेकरसह १६ आरोपी गजाआड असून, त्यात महिलांचाही समावेश आहे. या टोळीने वर्षानुवर्षे खंडणी, हल्ले आणि बेकायदेशीर धंद्यातून उभारलेले फ्लॅट्स, दुकाने, जमिनी व व्यवसाय पोलिसांनी नोंदणी करून गोठवले आहेत. टिपू पठाणचे बांधकाम पाडले काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगार रिझवान ऊर्फ टिपू पठाण यांच्या अनधिकृत बांधकामावर पोलिसांनी बुलडोझर फिरवला. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवून ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत, गुन्हेगारांचा आर्थिक कणा मोडला, तरच शांती प्रस्थापित होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यावरही पोलिसांची नजर आहे. घायवळ युरोपमध्ये पळून गेला असला, तरी त्याच्या पुण्यातील मालमत्तेची चौकशी सुरू झाली आहे. तीन दुचाकी आणि एक स्कॉर्पिओ आधीच जप्त झाली असून, पुढील काही दिवसांत त्याच्या बंगल्यांवर आणि व्यावसायिक ठिकाणांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. कठोर कारवाईतून संदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे, की गुन्हेगारांची अवैध संपत्ती जप्त केली, तर त्यांना पुन्हा पाय रोवणे कठीण जाईल. हा संदेश आम्ही कारवाईतून देत आहोत. दरम्यान, शहरात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर लागू झालेला बुलडोझर जस्टिसचा हा प्रयोग सामान्य नागरिकांना धीर देणारा ठरत आहे, तर सराईत गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.