सिंहगडरस्ता -सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. अगोदरच अरुंद असलेला हा रस्ता उड्डाणपुलाच्या कामामुळे रहदारीस खूप अडचण होत आहे. त्यातच नागरिकांना रस्त्याच्या कोणत्या बाजूला वाहने पार्क करायची याचा प्रशासनाकडून निर्णय होत नाही. त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांची वाहतूक पोलिसांकडून कारवाई होते. संध्याकाळच्या वेळेस सिंहगड रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असते. त्यातच फूटपाथवर व्यवसाय करणारे भाजीवाले, फळ विक्रेते पथारीवाले यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी अधिक वाढते. सनसिटी रस्ता संध्याकाळच्या वेळेस फारच गजबजलेला असतो. या रस्त्यावर सायंकाळच्या वेळेस भाजीविक्रेते, फळविक्रेते पथारीवाले रस्त्यावर व्यवसाय करतात, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. सनसिटी भागात मनपातर्फे करोडो रुपये खर्च करून भाजी मार्केट बांधण्यात आले आहे. परंतु या ठिकाणी विक्रेते व्यवसाय करण्यास उत्सुक नाहीत. या भागातील नगरसेविका मंजुषा दीपक नागपुरे यांनी सांगितले की आम्ही वारंवार भाजीविक्रेते, फळविक्रेते यांना आवाहन केले, मात्र याला ते प्रतिसाद देत नाही. त्यामुळे आमचाही नाईलाज होतो. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या विक्रेत्यांनी भाजी मार्केटचा उपयोग केला पाहिजे. तसेच नागरिकांनाही त्यांना सहकार्य केले तर वाहतूक सुरळीत होईल. वडगाव बुद्रुक मध्ये कॅनललगत 152 भाजीविक्रेते, फळविक्रेते यांचेसाठी अशी सोय महापालिकेतर्फे वडगाव भागात नगरसेवक हरिदास चरवड यांनी केली आहे. परंतु या मार्केटकडेही व्यवसायिकांनी पाठ फिरवली आहे. मनपातर्फे आम्ही भाजीविक्रेते, फळविक्रेते यांना सर्व सुविधायुक्त मार्केट बांधून दिले आहे. परंतु ग्राहकांनाही गाडीवर बसूनच भाजी खरेदी करता आली पाहिजे आणि विक्रेत्या ला ही रस्त्याच्या अगदी जवळच व्यवसाय करणे सोपे असते त्यामुळे ही विक्रेते भाजी मार्केटमध्ये व्यवसाय करण्यासाठी उत्सुक नाहीत. -प्रदीप आव्हाड, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय