पुणे – प्रभू श्रीराम ही व्यक्ती नव्हे, तर आदर्श, संस्कृती आणि अखंड भारतवासीयांच्या मनामनात असलेल्या भक्तीचा त्रिवेणी संगम आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवर प्रभू श्रीराम विराजमान होत आहेत, हा क्षण देशवासीयांसाठी दीपोत्सवच आहे, असे प्रतिपादन पर्यावरण, वणे आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केले.
संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे (शि. प्र.) आयोजित डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील ‘अपने अपने राम’ या तीन दिवसीय विशेष कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी चौबे बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, माजी मंत्री दिलीप कांबळे, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यावेळी उपस्थित होते.
अश्विनीकुमार चौबे म्हणाले की, सनातनी संस्कृती, हिंदू धर्मातील प्रत्येकजण अयोध्येत साकारलेले राम मंदिर पाहण्यासाठी उत्सुक आहे. लाखो कारसेवकांनी मंदिर वही बनायेंगेचा नारा देत दिलेला लढा शेकडो वर्षांनी यशस्वी झाल्याचे समाधान आहे. पुण्यातूनही मोठ्या संख्येने कारसेवक सहभागी झाले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्यदिव्य मंदिर उभारण्यात घेतलेल्या पुढाकारामुळे हे स्वप्न साकार होत आहे.
प्रास्ताविकात मुरलीधर मोहोळ म्हणाले की, जगातील सर्वात सुंदर व भव्य मंदिरात रामलल्ला विराजमान होत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. पुणेकरांना डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी उपलब्ध करून देताना मला आनंद होत असल्याच्या भावना कार्यक्रमाचे संयोजक मुरलीधर मोहोळ यांंनी व्यक्त केल्या. यावेळी बिट द अनबिटेबल डान्स ग्रुपने केलेल्या नृत्य सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.