पुणे : शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी निलेश घारे यांच्या मोटारीवर सोमवारी रात्री पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना वारजे भागात घडली. सुदैवाने मोटारीत कोणी नसल्याने गंभीर घटना टळली. गोळीबार झाला तेव्हा घारे त्यांच्या कार्यालयात होते. हल्लेखाेराने मोटारीच्या काचेवर गोळीबार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी निलेश राजेंद्र घारे (३७, रा. स्वरा हाईट्स, न्यू अहिरेगाव, वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घारे यांच्या मोटारीवर गोळीबार केल्याप्रकरणी दोन ते तीन जणांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारे हे शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी आहेत. त्यांचा हाॅटेल व्यवसाय आहे. जिवाला धोका असल्याच्या तक्रार अर्ज त्यांनी काही दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण आणि वारजे पोलिसांकडे दिला होता. त्यांचा एकाशी वादही झाला होता. त्यांचे वारजे माळवाडी, गणपती माथा येथे ऑफिस आहे. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ते कार्यालयात थांबले होते. मोटार त्यांनी कार्यालयाच्या समोर लावली होती. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखाेरांनी मोटारीच्या पाठीमागील बाजूच्या काचेवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून घारे कार्यालयातून पळत बाहेर आले. त्यांनी या घटनेची माहिती वारजे पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त कदम, वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत कोईगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक पुंगळी जप्त केली आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी गणपती माथा परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस निरीक्षक कोईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरळे तपास करीत आहेत.