Pune : शिवाजीनगर, स्वारगेट बस डेपो आणि मेट्रो स्थानक विकसित होणार

पुणे : शिवाजीनगर आणि स्वारगेट एसटी बसस्थानक विकसीत करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा आणि १ मे २०२५ रोजी प्रकल्पाचे भूमीपूजन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सांमजस्य करार तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही माहिती राज्याच्या परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी दिली.
आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर बसस्थानक विकासासाबाबत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरवठा केला. माधुरी मिसाळ यांनी नुकताच परिवहन राज्यंमत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर शिवाजीनगर आणि स्वारगेट बसस्थानकाचा मुद्यावर मुंबई बुधवारी (दि. १२) झालेल्या आढावा बैठकीत चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर तसेच राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर उपस्थित होते.
शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा घेतलेला निर्णय पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी महामेट्रो आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करावे. हा प्रकल्प निर्धारीत कालावधीत पूर्ण करण्यासाठी येत्या महाराष्ट्र दिनी (१ मे २०२५) या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सांमजस्य करार तातडीने पूर्ण करावेत, असे अजित पवार यांनी संगितल्याचे मिसाळ म्हणाल्या.
शिवाजीनगर बस स्थानकाच्या धर्तीवर स्वारगेट येथील बस स्थानक आणि मेट्रो स्थानक विकसित करण्याबाबत सूचना केल्या. येत्या आठ दिवसात प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.
– माधुरी मिसाळ – परिवहन राज्यमंत्रीशिवाजीनगर येथे अत्याधुनिक एसटी बसस्थानकाचे भूमिपूजन मे २०२५ मध्ये होईल. त्याअधी मेट्रोच्या वरील बाजूस हे बसस्थानक उभारण्यासाठी एसटी महामंडळ आणि महा मेट्रो यांच्यात येत्या आठवड्यात एमओयु करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी सुमारे ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तीन वर्षात बस स्थानक बांधण्यात येईल.
– आमदार सिध्दार्थ शिरोळे
शिवाजीनगर बस स्थानक २०१९ मध्ये वाकडेवाडी येथे स्थलांतरित झाले. मागील पाच वर्षात जुन्या स्थानकाच्या विकासावर केवळ चर्चाच सुरू आहे. प्रत्येकवेळी बसस्थानकाच्या विकासाचे भिजत घोंगडे बाहेर काढायचे; बैठका आणि चर्चा करायची, प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना द्यायचे. एवढच काय तर आंदोलनही करायची. मात्र, पुन्हा जैसे थे परिस्थिती. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून ही दोन्ही बसस्थानके विकासापासून वंचीत आहेत.





