Pune Crime : शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात गावठी पिस्टल घेऊन येणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपीकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून त्याच्याकडे हे शस्त्र कुठून आले याचा पुढील तपास सुरू आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ मार्च २०२६ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील गुन्हे तपास पथकाचे सपोनि संतोष पाटील, पोहवा १७२८ दिपक चव्हाण व पोना. २२९७ सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली की, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळील परिसरात एक सराईत गुन्हेगार हा त्याचे ताब्यात गावठी पिस्तुल घेवुन येणार आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन पथके तयार करून परिसरात सापळा रचला. त्यानंतर संशयित हालचाली करणाऱ्या सिद्धार्थ अनिल चोराडे ( २०, रा. ज्ञानेश्वर नगर, तळेगाव दाभाडे) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व दोन जिवंत राऊंड आढळून आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपीकडे हे बेकायदेशीर शस्त्र कोठून प्राप्त झाले याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलीस नोंदी तपासल्यानंतर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्यावर यापूर्वी शिवाजीनगर व तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त हृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, दीपक चव्हाण, सचिन जाधव, प्रमोद मोहिते, महावीर बलटे, राजकिरण पवार, तायडे व श्रीकृष्ण सांगवे यांनी केली.