महापालिका निवडणूक; भाजपच्या निर्णयाकडे लक्ष पुणे – भाजप- शिवसेना युतीत पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला किती जागा मिळाव्यात, त्यामध्ये कोणते प्रभाग आणि उमेदवार असतील, याची यादी शिवसेना पक्षप्रमुखांकडे पाठविण्यात आली आहे. त्यामध्ये शिवसेनेकडून जवळपास ४० जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आता भाजप किती जागा देणार, त्यावर शिवसेना संमती दर्शविणार, की वेगळा निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय भाजप- शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार मागील आठवड्यात युतीची बैठक झाली आणि प्राथमिक चर्चाही पार पडली. त्यानंतर पुणे शहरातील शिवसेनेच्या नेत्या व विधानपरिषद उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, शिवसेना उपनेते व आमदार माजी मंत्री विजय शिवतारे, पुणे महानगर प्रमुख व माजी आमदार रवींद्र धंगेकर, शहरप्रमुख नाना भानगिरे यासह आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागा वाटपाबाबत चर्चा पार पडली. त्यामध्ये २०१७ मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले प्रभाग, दुसऱ्या क्रमांकाची मते असलेले उमेदवार, तसेच नव्याने पक्षप्रवेश झालेले उमेदवार या सर्व बाबींचा विचार करून शिवसेनेकडून ४० जागांची मागणी करण्यात आली असून, त्यामध्ये कोणत्या प्रभागात कोण उमेदवार असेल, याची माहिती आणि नावे या यादीला जोडल्याचे समजते. ही यादी शिवसेना प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोमवारी (दि. २२) पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे आता भाजपकडून प्रत्यक्षात शिवसेनेला किती जागा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.