पुणे – शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा पुण्यात भाजपला थेट फायदा झाला आहे. शहरात १६३ प्रभागांसाठी झालेल्या एकूण मतदानात तब्बल ४३.१० टक्के मतदान एकट्या भाजपला झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला २३.९९, काँग्रेसला ८.४८, शिवसेना ६.९९, तर शिवसेना ठाकरे पक्षाला ४.२० टक्के मतदान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला केवळ ३.८६ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र नसल्यचा सरळसरळ फायदा भाजपला झाला आहे. महापालिकेकडून मतमोजणीनंतरची अंतिम आकडेवारी निश्चित करण्यात आली आहे. या माहितीतून ही बाब समोर आली आहे. महापालिकेच्या निवडणुका ४ सदस्यांच्या प्रभागात झाल्या असून, १६५ जागांवरील १६३ जागांसाठी मतदान झाले. त्यात, अ, ब, क, ड अशा प्रत्येक जागेसाठी सुमारे ३५ लाख ५१ हजार मतदार होते. या निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रीय, तसेच प्रादेशिक पातळीवर नोंद असलेले तब्बल ३५ राजकीय पक्ष, तसेच अपक्ष असे ३६ प्रकारचे उमेदवार होते. महापालिकेसाठी ५२ टक्के मतदारांनी आपला हक्क बजवाला असून, मतदारांना प्रत्येकी ४ मते द्यायची होती. एकूण ७४ लाख ६३ हजार ८२४ मतदान झाले. त्यात तब्बल ३२ लाख १८ हजार ६६४ मतदान (४३.१ टक्के) एकट्या भाजपला झाले आहे. त्यामुळे भाजपचे सुमारे ११९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्या खालोखाल सर्वाधिक १७ लाख ८६ हजार १७२ मतदान राष्ट्रवादी काँग्रेसला झाले आहे. तिसऱ्या क्रमांकाची ६ लाख ३२ हजार ९२४ मते काँग्रेसला मिळाली आहेत. शिवसेनेला ५ लाख २२ हजार १३८ मते मिळाली असून, शिवसेना ठाकरे पक्षाला ३ लाख ११ हजार ६६९ मते मिळाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला २ लाख ८८ हजार २०० मते मिळाली आहेत. उर्वरीत मतांमध्ये इतर प्रमुख राजकीय पक्ष, अपक्ष, तसेच नोटाला मिळालेल्या मतांचा आकडा आहे. तीन प्रमुख पक्षांपेक्षा नोटा अधिक मतदानाच्या आकडेवारीनुसार या निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्या काही मोठ्या राजकीय पक्षांपेक्षाही नोटाला अधिक मतदान झाले आहे. पुण्यात नोटाला एकूण २ लाख २१ हजार २०९ मतदान झाले आहे, तर सर्व अपक्ष उमेदवारांना १ लाख ४७ हजार २७८ मतदान झाले आहे. मनसेला झालेले मतदानही नोटापेक्षा कमी असून, ते १ लाख ५५ हजार ७८८ आहे. आपला शहरात ५० हजार ५७१ मतदान झाले असून, बसपाला ३२ हजार ६७ आणि वंचितला ७९ हजार ८९२ मतदान झाले आहे. त्यामुळे पुणेकरांनी यंदा प्रमुख पाच पक्षानंतर नोटाला पसंती दिल्याचे वास्तव आहे शिवसेना- राष्ट्रवादीला फुटीचा तोटा राज्यात सत्तापालट करण्यासाठी भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडत या पक्षातील नाराज गटाला महायुतीत केंद्रात व राज्यात सत्तेत घेतले. या फुटीचा फटका या दोन्ही पक्षांना बसला असून, भाजपला थेट फायदा आहे. दोन्ही शिवसेनेला पडलेली मते एकत्र केल्यास त्यांची एकूण मतदान ८ लाख ३४ हजारांवर १ टक्क्यांवर जाते, तर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र असते, तर त्यांचे मतदान २० लाखांच्या पुढे म्हणजेच जवळपास २७ टक्क्यांवर जाते. मात्र, अनेक जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बाहेर पडलेले गट एकमेकांच्या समोर लढल्याने या दोघांचेही नुकसान झाले आहे. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या असल्या, तरी दोन्ही पक्षांनी घड्याळ आणि तुतारी चिन्ह घेतल्याने मतदारांमध्ये गोंधळ झाला. एकसंध असताना २०१७ राष्ट्रवादीला ३८ जागा मिळाल्या होत्या. आता एकत्र लढूनही केवळ ३० जागा मिळाल्या आहेत. शिवसेना एकत्र असताना १० जागा आल्या होत्या, तर आता केवळ १ जागा आली आहे. शिवसेना शिंदे गटाला एकही जागा मिळलेली नाही. आघाडी फुटल्याने ४५ जागांचे नुकसान ज्याप्रमाणे शिवसेना- राष्ट्रवादीच्या फुटीने भाजपला फायदा झाला, त्याचप्रमाणे राज्यात महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी पवार पक्ष बाहेर पडल्याने शहरात सुमारे ४० ते ४५ जागांवर महाविकास आघाडीला फटका बसला आहे. हे तिन्ही पक्ष एकत्र असते, तसेच महाविकास आघाडी म्हणून दोन्ही राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस एकत्र लढले असते, तर त्यांना मिळालेली मते पाहता या मतांची एकत्र टक्केवारी सुमारे ४२ टक्के होते. त्यामुळे या पक्षांना भाजपला रोखणे शक्य झाले असते. काही प्रमुख पक्षांना मिळालेली मते आणि टक्केवारी – भाजप – ३२ लाख १८ हजार ६६४ (झालेले मतदान) ४३.१ टक्के (टक्केवारी) – राष्ट्रवादी काँग्रेस – १७ लाख ८६ हजार १७२ – २३.९ टक्के – काँग्रेस – ६ लाख ३२ हजार ९२४ – ८.४८ टक्के – शिवसेना – ५ लाख २२ हजार १३९…. ६.९९ टक्के – शिवसेना ठाकरे पक्ष – ३ लाख ११ हजार ६६९ – ४.१८ टक्के – राष्ट्रवादी पवार पक्ष – २ लाख ८८ हजार २०० – ३.८६ टक्के – नोटा- २ लाख २१ हजार २०९ – २.९६ टक्के – मनसे – १ लाख ४७ हजार २७८- २.८ टक्के – वंचित – ७९ हजार ८९२ – १.०७ टक्के