पुणे – मुंढवा जमीन विक्री व्यवहारात शीतल तेजवानीच्या ऑफिसबॉयने कंपनीचा पार्टनर म्हणून अभिनिर्णय प्रक्रियेचा अर्ज, प्रतिज्ञापत्र आणि अधिकारपत्रावर स्वाक्षरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याअनुषंगाने झालेले व्यवहार, दस्ताच्या देवाणघेवाणीबाबत बावधन पोलीस तपास करत आहेत. त्यासाठी तेजवानीच्या पोलीस कोठडीत २७ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. मुंढवा येथील सरकारी जमीन पार्थ पवारांची भागीदारी असलेल्या अमेडियाला विकताना सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी कुलमुखत्यार शीतल किसनचंद तेजवानी, कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्याविरोधात बावधन ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अटकेत असलेल्या तेजवानीच्या कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी (दि.२३) तिला न्यायालयात हजर केले. पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यातील पॉवर ऑफ ॲटर्नी (मुखत्यारपत्र) व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे दस्तावेज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी जाहीर केले आहेत. तेजवानीच्या वकिलांनीच दिलेल्या मुखत्यारपत्राच्या प्रत्येक पानावर पार्थ पवार यांची स्वाक्षरी असून, त्यांचे तेजवानीसह व्हॉट्सअप चॅटिंगही असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. त्याचा दाखला बावधन पोलिसांनी न्यायालयासमोर दिला. तेजवानीने दस्तासाठी वकिलांना दिलेली रक्कम आणि समाजमाध्यमात प्रसारित झालेल्या कागदपत्रांविषयी तपास करायचा आहे. त्यासाठी तेजवानीच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी तपास अधिकारी वरिष्ठ निरीक्षक अनिल विभुते आणि सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.