Pune: स्वरूप प्रकाशन, पुणे यांच्या वतीने आयोजित Educational Thought & Works of Chh. Shahu Maharaj आणि संत तुकारामाची आक्रोश गाथा या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नुकताच पत्रकार भवन, पुणे येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच दोन्ही पुस्तकांचे लेखक डॉ. जे. बी. शिंदे यांना सभागृहात दोन मिनिटे श्रद्धांजली वाहण्यात आली. दै. प्रभातचे कार्यकारी संपादक अविनाश भट यांनी आपल्या भाषणात शाहू महाराजांचे कार्य अद्वितीय असल्याचे सांगत, त्याचा प्रसार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशात झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले. आजची पिढी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असल्याने महापुरुषांचे विचार आणि कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी इंग्रजी माध्यमातील पुस्तकांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी असलेले अनिल ताडगे यांनी शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. स्वरूप प्रकाशनचे प्रकाशक सुरेश शिंदे यांनी इंग्रजी माध्यमातून पुस्तक प्रकाशित करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना, नव्या पिढीला छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची माहिती व्हावी, हा उद्देश असल्याचे सांगितले. डॉ. जे. बी. शिंदे यांच्या कन्या विशाखा जितकर यांनी डॉ. शिंदे हे संत तुकाराम महाराजांचे गाढे अभ्यासक असल्याचे सांगत त्यांच्या प्रबोधनपर लेखनकार्याचा आढावा घेतला. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा उल्लेख केला. इतिहास संशोधक अनंत दारवटकर यांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी नवलेखिका व शिवव्याख्याती आरती ढोले तसेच उज्वला गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गंगाधर बनबरे, स्वरूप शिंदे, गिरीश कवडे, अनिल शिंदे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार व कवी श्रीनिवास वारूंजीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.