पुणे : आरोग्य क्षेत्रातील ‘लाईफ लाईन’ असलेल्या धर्मादाय (आयपीएफ) योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी. तसेच, या योजना सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचावी, रुग्णांना चांगले उपचार मिळणे आवश्यक असल्याचे मत शिवाजीनगर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आयपीएफ संबंधात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यक्त केले. राज्यातील धर्मादाय रुग्णालय चौकशी समिती सदस्य या नात्याने धर्मादाय योजनेच्या कार्यवाहीसाठी संबंधित शासकीय अधिकारी आणि धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी यांची बैठक पार पडली. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सुसज्ज आणि दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवताना येणाऱ्या समस्या आणि अडचणींवर चर्चा झाल्याचे शिरोळे यांनी सांगितले. यावेळी धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी, धर्मादाय कार्यालयातील न्यास निरीक्षक, समन्वयक, तसेच जिल्हा प्रशासनातील अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, नायब तहसीलदार सुयोग दिवसे, मुख्यमंत्री सहाय्यत निधी कक्ष अध्यक्ष डॉ. मानसिंग साबळे, तसेच आनंद छाजेड आणि प्रकाश सोळंकी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात सध्या सुमारे ६० रुग्णालये आयपीएफ योजनेअंतर्गत कार्यरत आहेत. या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल (निर्धन) रुग्णांना दिला जातो, अशा रुग्णांच्या तक्रारी आणि रुग्णालयांना भेडसावणाऱ्या समस्या यामध्ये समन्वय साधून योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील वैद्यकीय गरजांचा विचार करता, काही धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता भासते. येत्या काळात, योजनेअंतर्गत समाविष्ट सर्व रुग्णालयांमध्ये अधिक सक्षम समन्वय साधण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन, असे शिरोळे यांनी स्पष्ट केले.