पुणे – बदलती सामाजिक स्थिती पाहता आता मुलींनी शिक्षणासोबतच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. त्यात, प्रामुख्याने बॉक्सिंग व कराटेचे प्रशिक्षण गरजेचे असल्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी सांगितले. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान व मुक्ता फाउंडेशन यांच्या वतीने भवानी पेठ येथील बापूसाहेब पवार कन्या शाळेतील इयत्ता दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षितांचा संच वाटप करण्यात आले, यावेळी बागवे बोलत होते. रमेश बागवे म्हणाले की, मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी मोबाइलचा वापर हा फक्त शिक्षणासाठीच करावा. तसेच. आम्ही जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम या ठिकाणी कराटे व बॉक्सिंग प्रशिक्षण मागील अनेक वर्षांपासून देत आहोत. आपल्या शाळेतील मुलींना खेळाचे प्रशिक्षण द्यायचे असेल तर संबंधीतांनी याचा लाभ घ्यावा, त्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येइल असेही बागवे म्हणाले. माजी नगरसेवक अविनाश बागवे, इंदिरा बागवे, विठ्ठल थोरात, अरुण गायकवाड, सुनील बावकर, दयानंद अडागळे, जयदीप शेलार, हुसेन शेख, मारुती कसबे, आदित्य गायकवाड यावेळी उपस्थित होते.