Pune : आरटीई प्रतीक्षा यादीतील दुसरी प्रवेश फेरी सुरू

पुणे : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर आतापर्यंत ८१ हजार ७१४ बालकांचे प्रवेश झाले आहेत. रिक्त जागावरील प्रवेशासाठी आता प्रतीक्षा यादीची दुसरी फेरी मंगळवार (दि. ८) पासून सुरू करण्यात आली असून, ती १५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेत ८ हजार ८६३ शाळांमध्ये १ लाख ९ हजार १०२ प्रवेशाच्या जागा असून, ३ लाख ५ हजार १५१ बालकांचे अर्ज दाखल झाले होते. त्यातून १ लाख १ हजार ९६७ बालकांना प्रवेश जाहीर होऊन ६९ हजार ६५४ बालकांचे प्रवेश नक्की झाले आहेत.
प्रतीक्षा यादीत ८५ हजार ४५७ बालकांचा समावेश असून, पहिल्या फेरीत २६ हजार २०५ बालकांची निवड होऊन फक्त १२ हजार ६० प्रवेश झाले. अद्यापही एकूण २७ हजार ३८८ जागा रिक्त आहेत. त्यासाठी दुसरी फेरी सुरू केल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.





