पुणे-आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 25 टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा शाळा नोंदणीची संपूर्ण जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर असणार आहे. येत्या 17 जानेवारीपर्यंत शंभर टक्के शाळांची नोंदणी करावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिल्या.
यंदाही 2022-23 या वर्षांची आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येणार आहे. त्याकरीता पुणे जिल्ह्यातील 25 टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची नोंदणी दिनांक 28 डिसेंबर ते 17 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये करण्यात यावी. 25 टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. तरी पुणे जिल्ह्यातील शाळांची ऑनलाइन नोंदणी दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्यात यावी. ज्या जिल्ह्यांतील आरटीईअंतर्गत पात्र असलेल्या शाळांची 100 टक्के नोंदणी पूर्ण होणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी यांची राहील, असेदेखील टेमकर यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.