पुणे – जिल्ह्यात आयोजित ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यामुळे बुधवारी ( दि. २१ ) पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना पूर्ण वेळ सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. ग्रँड टूर दुसरा टप्पा ही स्पर्धा पुणे शहरातील अत्यंत वर्दळीच्या मार्गावरून जाणार आहे. या स्पर्धेचा मार्ग लेडिज क्लब (पुणे) – इस्ट स्ट्रीट रोड – खाण्या मारुती चौक – पुलगेट – सोलापूर बाजार चौकी – गोळीबार मैदान – लुल्लानगर चौक – ज्योती हॉटेल चौक – खडी मशिन चौक – येवलेवाडी – बोपदेव घाट असा आहे. या मार्गावर सायकलपटूंच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी निर्बंध घातले आहे. अशा परिस्थितीत शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी गैरसोय होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील अधिकारांचा वापर करत जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व शाळांना बुधवारी (दि.21) रोजी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.