Pune : फुले चित्रपटातील दृश्यांना कात्री नको

पुणे : महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांचा उद्धार करण्यासाठी कार्य केले; पण त्यांना छळणारे, चिखलफेक करणारे इंग्रज नव्हते, तर ते भारतीयच होते. फुले चित्रपटातून हेच दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्यातील दृश्यांना कात्री लावू नये. केंद्र व राज्य सरकारच सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून या चित्रपटातील दृश्यांना कात्री लावत आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
पुणे काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार रमेश बागवे, दीप्ती चवधरी आदी उपस्थित होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय आहे. त्यामुळे सरकारने येथील संचालक मंडळ बरखास्त करावे आणि हे रुग्णालय ताब्यात घ्यावे.
लता मंगेशकर यांच्या विरोधामुळे मुंबईतील उड्डाणपूल रद्द केला; पण आत याच मंगेशकरांचा संबंध असलेल्या दवाखान्याकडून मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. चौकशी समित्यांचे अहवाल येतीलच; पण सरकारने मोबाइल सीडीआर तपासून व सीसीटीव्ही तपासून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
खासदारांचे वक्तव्य दुर्दैवी
खासदार उदयनराजे भोसले यांनी थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सर्वांत आधी मुलींची शाळा साताऱ्यातील राजवाड्यात सुरू केल्याचा दावा केला. त्यावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, की मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली, याला सर्व जग साक्षी आहे. खोडसाळ पद्धतीने इतिहासाची छेडछाड करू नये. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली. सावित्रीबाई फुले यांच्यावर चिखलफेक करणाऱ्यांचा इतिहास चित्रपटात दाखवू नये, यासाठी प्रयत्न करणाऱ्या चुकीच्या लोकांची उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले पाठराखण करीत आहेत. हे मोठे दुर्देव म्हणावे लागेल.





