Pune Satara Highway : गडकरींच्या दौऱ्यातच महामार्ग जाम! देगाव स्टॉपवर ऑइल गळतीमुळे गाड्या घसरल्या
Pune Satara Highway : नितीन गडकरींचा ताफा याच मार्गावरून साताऱ्याकडे रवाना; कोंडीमुळे प्रशासनाकडून विरुद्ध दिशेचा मार्ग वापरून मंत्र्यांच्या गाड्या पुढे काढल्या.

Pune Satara Highway – पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील चेलाडी उड्डाणपुलाखालील देगाव स्टॉप परिसरात शनिवारी (दि. ३०) एका वाहनातून मोठ्या प्रमाणात ऑइल गळाल्याने गंभीर वाहतूक कोंडी निर्माण झाली. रस्त्यावर ऑइल पसरल्यामुळे वाहने घसरू लागल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
या घटनेमुळे देगाव स्टॉप परिसरातील अपूर्ण सर्व्हिस रोडचा आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत रस्त्यावरील ऑइलवर माती व पोती टाकून रस्ता पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला.
देगाव स्टॉप हा परिसर आधीपासूनच वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरला आहे. नसरापूरकडून येणारी वाहने आणि चेलाडी उड्डाणपुलावरून खाली उतरणारी वाहने सर्व्हिस रोड अचानक संपत असल्यामुळे थेट मुख्य महामार्गावर समोरासमोर येतात. त्यामुळे येथे वाहनांची मोठी गर्दी होऊन वारंवार जीवघेणे अपघात घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार पाठपुरावा करूनही हे काम रखडलेलेच आहे. शनिवारी गडकरींचा ताफा या मार्गावरून गेल्याने त्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली आहे. त्यामुळे आतातरी केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर देगाव स्टॉप परिसरातील अपूर्ण सर्व्हिस रोडचा प्रश्न मार्गी लागणार का? की या गंभीर समस्येकडे ढिम्म प्रशासनाचे दुर्लक्षच राहणार, असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मंत्र्यांच्या ताफ्यासाठी विशेष व्यवस्था
ही घटना घडली त्याच वेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा ताफा पुण्याकडून साताऱ्याकडे जात होता. महामार्गावरील कोंडीची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारा विरुद्ध दिशेचा मार्ग काही काळासाठी मोकळा करून मंत्र्यांचा ताफा पुढे रवाना केला.

