Pune: सर्व तालुक्यांत दिला जाणार एकसारखा निधी; अजित पवार यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

पुणे – जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर कामांसाठी संबंधित यंत्रणांनी 31 मे पर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन डिसेंबरअखेर कामे पूर्ण करावीत, अशा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकसारखा निधी दिला जाईल, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. विधानभवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, दिलीप वळसे पाटील, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, राहुल कुल, सुनील कांबळे, सुनील शेळके, सिद्धार्थ शिरोळे, महेश लांडगे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे.
शंकर मांडेकर, हेमंत रासणे, शंकर जगताप, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिंधी विकास कामांची माहिती 15 मे पर्यंत प्रशासनाकडे सादर करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी 31 मे अखेर प्रशासकीय मान्यता घेऊन पुढील कार्यवाही डिसेंबरअखेर पूर्ण करावी. जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर कामाचा आढावा घेतला जाणार असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकासकामे वेळेत, दर्जेदार, गुणवत्तापूर्वक होईल याकडे लक्ष द्यावे. गडकिल्ले, पर्यटनस्थळे आदी ठिकाणे पर्यटकांना सुरक्षित वाटली पाहिजे, याकरिता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
जिल्ह्यात पुणे मॉडेल स्कूल अर्थात आदर्श शाळांचा उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्याअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील केंद्र शाळा स्तरावर एका मोठ्या शाळेचा भौतिक तसेच दर्जात्मक विकास करण्यात येणार आहे. भौतिक सुविधांसोबतच शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही पवार यांनी यावेळी दिल्या.





