Pune: उत्तेजक औषधांची प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री

पुणे – राज्यातील औषध विक्रेते ऑनलाइन अथवा ऑफलाइनद्वारे मैदानी खेळाडूंना कामगिरी उंचावण्यासाठी (डोपिंग) लागणारी उत्तेजक औषधे कोणत्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जात आहेत. नियमबाह्य पद्धतीने हा प्रकार सुरू असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कुस्तीविद्या मल्ल महासंघाने केला आहे.
अशा औषधविक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही महासंघाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) केली आहे. त्याबाबतचे निवेदन महासंघाचे तांत्रिक समिती शहर अध्यक्ष पै. निकुंज उभे यांनी एफडीए आयुक्तांना दिले.
महासंघाने ‘एफडीए’ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अशा औषधांची विक्री ऑफलाइन, तसेच ऑनलाइन पद्धतीने होते. शारीरिक क्षमता जलद गतीने वाढावी म्हणून क्रीडापटू उत्तेजक पदार्थ, मादक द्रव्ये असलेल्या औषधांचे सेवन करतात. सध्या राज्यातील कुस्तीपटू, कबड्डीपटू, शरीरसौष्ठवपटू आणि मैदानी खेळांतील क्रीडापटूंमध्ये ही औषधे सेवन करण्याचे प्रमाण जास्त आहे.
अनेक क्रीडापटू ‘डोपिंग’च्या आहारी गेल्याचे दिसते. अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीमुळे असे क्रीडापटू डोपिंग करतात. खेळातील प्रगतीच्या जोरावर प्रसिद्धी, तसेच खेळाडू कोट्यातून शासकीय नोकरी मिळावी म्हणून ते अशा मार्गांचा अवलंब करतात. मात्र, यामुळे त्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते.
डोपिंगसंदर्भात काम करण्याऱ्या विश्व डोपिंग संस्था व राष्ट्र डोपिंग संस्था या संस्थांनी डोपिंगचे प्रमाण वाढत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याकडे वेळीच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
– औषधविक्री दुकानांत फार्मसी पदवीधारकच असावा
– प्रिस्किप्शनची पडताळणीही व्हावी
– डोपिंग संलग्न औषधांबदल विक्रेत्याला माहिती असावी
– भेसळयुक्त औषधे विक्री होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक
– ऑनलाइन उत्तेजक औषध विक्रेत्यांवरही कारवाई व्हावी
“काही डॉक्टर व औषध विक्रेते खेळाडूंना चुकीची माहिती देऊन जास्त दर आकारून अशा औषधांची विक्री करतात. काही ‘सप्लिमेंट’ विक्रेते, वितरक याची विनापरवाना विक्री करतात. अवैधपणे औषधे विकणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांचा परवाना रद्द करून क्रीडा क्षेत्राची वाढत्या ‘डोपिंग’ पासून सुटका करावी.” – पै. निकुंज उभे, शहर अध्यक्ष, तांत्रिक समिती राज्य कुस्तीविद्या मल्ल महासंघ.





