Pune : सुरक्षा विभागातील वेतनात गैरव्यवहार ?

पुणे : महापालिकेच्या सुरक्षा विभागात निविदा प्रक्रिया आणि वेतनामध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करावी, अन्यथा लोकआयुक्तांकडे दाद मागण्याचा इशारा त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना दिला आहे.
बागवे यांनी निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षा विभागातील निविदा काढताना नियमांचे पालन केले जात नाही. सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीच्या तुलनेत अधिकचे वेतन दिले जात आहे. तसेच, राज्य सुरक्षा मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी २६ दिवस काम करूनही त्यांना ४० दिवसांचे वेतन दिले जात आहे. यामुळे सुरक्षा विभागच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिला आहे.
तसेच मुख्य सभेमध्ये परिमंडळनिहाय स्वतंत्र निविदा काढून कंत्राटदार नेमण्याचा निर्णय झाला असताना, प्रशासनाकडून एकच निविदा काढून बेकायदेशीररित्या नियुक्त्या केल्या जात आहेत. सुरक्षा रक्षकांऐवजी मदतनीस व बहुद्देशीय कामगारांच्या नियुक्तीसाठी निविदा काढून त्यांना सुरक्षा रक्षकांचे काम दिले जाते.
हा प्रकार केंद्र व राज्य शासनाच्या नियमांविरोधात आहे. या प्रकारांमुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच बदनामीही होत आहे. ही बाब लक्षात घेवून चुकीचे काम करणाऱ्या सर्व दोषीवर कारवाई करावी, अशी मागणीही बागवे यांनी केली आहे.




