पुणे ग्रामीण – सणसवाडी (ता. शिरूर) नरके वस्ती येथे ५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राजाराम नरके यांच्या घरात अचानक गॅसचा स्फोट होऊन घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सुमारे सात लाखांचे नुकसान झाले असल्याचे समजते. सदर घटनेची माहिती मिळताच आमदार अशोक पवार यांनी तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहे. सणसवाडी येथील नरके वस्ती येथे रामदास दत्तात्रय नरके यांच्या घरात रोहिणी नरके या स्वयंपाक करत असताना अचानकपणे गॅसचा स्फोट होऊन घराला आग लागली. यावेळी झालेल्या घटनेनंतर घरातील सर्व लोक बाहेर तातडीने बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र नरके यांच्या घरातील सर्व साहित्य ज्यामध्ये कपड्यासह अनेक चीज वस्तूचा समावेश होता जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच सणसवाडीच्या सरपंच सुवर्णा दरेकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, शिरूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, बाजार समितीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, माजी सरपंच संगीता हरगुडे, सुरेश हरगुडे, उद्योजक रामदास दरेकर, निलेश दरेकर, ग्रामपंचायत सदस्य तनुजा दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर, सुभाष दरेकर, नवनाथ दरेकर, नवनाथ हरगुडे, प्रा. अनिल गोटे यांसह आदींनी नरके यांच्या घरी भेट देत पाहणी करून कुटुंबीयांना धीर दिला, यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर यांच्या माध्यमातून आमदार अशोक पवार यांनी फोनवर नरके कुटुंबीयांशी संवाद साधत तातडीने शिरूरच्या तहसीलदारांना फोन करत गॅसमुळे घडलेल्या घटनेचा तसेच जळालेल्या घराचा पंचनामा करत कुटुंबीयांना शासकीय मदत देण्याच्या सूचना दिल्या, तसेच यावेळी पंडित दरेकर यांसह आदींनी राजाराम नरके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करत त्यांना आधार दिला. तर यावेळी नरके कुटुंबियांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून तातडीने मिळावी अशी मागणी ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.