Pune RTO Action – शाळांना सुट्ट्या सुरू झाल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे, एसटीसह खासगी ट्रव्हल्सला गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महामार्गावर धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मागील चार दिवसांत या धडक मोहिमेत २९० वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १०० बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दि. १७ ते २० एप्रिल दरम्यान पुणे आरटीओच्या आठ विशेष पथकांतील ४५ अधिकाऱ्यांनी स्वारगेट, कात्रज, नवले ब्रीज, खेडशिवापूर, हडपसर, शिवाजीनगर, संगमवाडी या परिसरात खासगी कंत्राटी बसेसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये कागदपत्रांची मुदत संपलेली असणे, आपत्कालीन दरवाजा आणि हॅच सुस्थितीत नसणे, अनधिकृत बदल, जादा भाडे आकारणे आणि मालाची वाहतूक करणे अशा गंभीर बाबींचा समावेश आहे. याशिवाय मद्यप्राशन करून वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर आणि राँग पार्किंग करणाऱ्या चालकांवरही कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितले. तक्रार नोंदविण्याचे आवाहन आरटीओ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी सुरक्षित प्रवास हीच आपली जबाबदारी, हे अभियान राबवून प्रवाशांशी थेट संवाद साधून आपत्कालीन परिस्थितीत घ्यायची काळजी आणि वाहतूक नियमांची माहिती दिली. या उपक्रमाचे प्रवाशांकडून स्वागत होत असून, वाहनचालकांनाही रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रवासात जादा भाडेदर आकारणी, तसेच प्रवासातील अडचणींबाबत प्रवाशांच्या तक्रारी असल्यास आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, तिकिटाच्या फोटोसह ८२७५३२३०१०१ या व्हॉट्सअप क्रमांवर अथवा mhl2prosecution.rtopune@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन आरटीओने केले आहे.